Chhath Puja 2026 : मनसेचा तुफान राडा, छटपुजेवरुन वातावरण तापलं, बैठक उधळून लावण्यासाठी गेटवरच…
Banganga chhath puja controversy : मुंबईतील बाणगंगा परिसरात छटपूजेच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. छटपूजेच्या तयारीसाठी महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी या आयोजनाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. 'काहीही झालं तरी बाणगंगेत छटपूजा होऊ देणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबईतील बाणगंगा परिसरामध्ये छटपुजेला मनसेनं विरोध केला आहे. बाणगंगेमध्ये छटपुजेच्या तयारीसाठी डी वॉर्डमध्ये, बैठक सुरु झाल्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी विरोधाची भूमिका घेत थेट बैठक उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ही छटपूजा होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजीही केली आहे.
त्यांचे सण उत्सव आहेत. त्यांनी ते नक्की करावेत. काही विरोधाचं कारण नाही. पण त्यांनी ते त्यांच्या राज्यामध्ये करावेत, इथे त्यांनी शक्तीप्रदर्शन करु नये, असं मत मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना मांडलं आहे. ही छटपुजा कोणासाठी करतात. ही छटपूजा करण्यासाठी प्रशासनही का आग्रही आहे. त्यांना का स्टेज तयार करुन दिला जात आहे, आमदार लोढा मिटिंग घेतात, तुम्ही हिंदू उत्सवांसाठी काय करताय. बाणगंगा तलावामध्ये गणपती विसर्जन असेल किंवा देवीचं विसर्जन करु देत नाहीत मग छटपुजेचे उत्सव साजरे करण्यासाठी तुम्ही कसे तयार होतात, असा सवाल यावेळी मनसेने केली आहे.
पितृपक्ष होता. त्यावेळी बाणगंगा याठिकाणी मोठं जलप्रदुषण झालं होतं. मासे त्याठिकाणी मृत पावलेले. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे मनसेने यावेळी या संपूर्ण छटपुजेच्या प्रक्रियेलाच विरोध केला असून काहीही झालं तरी आम्ही छटपुजा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरु ही होऊ घातलेली बैठक आम्ही उधळून लावू अशा प्रकारचा कडक इशारा यावेळी मनसेने दिला आहे.
कोणतीही बैठक नसल्यांचं यावेळी मनसे कार्यकर्त्यांना कळवण्यात आलं पण जोपर्यंत अधिकृतरित्या छटपुजेबद्दल रद्द करण्यासंबंधीची माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी सर्व भूमिका यावेळी मनसेने घेतली आहे. उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत म्हणून भाजप हे राजकारण करु पाहतंय अशी टीका यावेळी मनसेने केली आहे.
