Operation Sindoor नंतर चीनची नीच हरकत उघड, फ्रान्सच्या गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर चीनचा अजून एक खोटेपणा उघड झालाय. चीनने त्यासाठी आपल्या दूतावासाचा वापर केला. फ्रान्सच्या गोपनीय रिपोर्टमधून काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

Operation Sindoor नंतर चीनची नीच हरकत उघड, फ्रान्सच्या गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
Opertation Sindoor चा लोगो कोणी केला तयार ?
Image Credit source: social media
| Updated on: Jul 07, 2025 | 10:21 AM

ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चार दिवस लढाई चालली. भारताने या छोट्याशा युद्धात पाकिस्तानला धडा शिकवलाच. पण चिनी शस्त्रांची मर्यादा देखील स्पष्ट झाली. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने चिनी मिसाइल्स हवेतच नष्ट केली. चीनने या संघर्षात पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत केली. पण भारताने आपल्या रणनितीच्या बळावर या लढाईत पाकिस्तानला धूळ चारली. ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर चीनने अजून एक खोटेपणा केल्याच समोर आलं आहे. फ्रान्सच्या गोपनीय रिपोर्टमधून काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. चीनने आपल्या दूतावासाच्या माध्यमातून राफेल जेट विमानांच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

फ्रान्सच्या गोपनीय रिपोर्टनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर चीनने प्रोपेगेंडा कॅम्पेन सुरु केलं. राफेल विमानांची विक्री प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. ज्या देशांनी फ्रान्सला राफेल फायटर जेट्सची ऑर्डर दिली होती, त्या व्यवहाराला प्रभावित करण्याचा, रोखण्याचा प्रयत्न चीनने आपल्या दूतावासाच्या माध्यमातून केला. आपली विमानं विकता यावीत, म्हणून चीनने हा सर्व खेळ केला.

फ्रान्सच्या इंटेलिजन्स रिपोर्टमधून हा खुलासा

ऑपरेशन सिंदूरवेळी इंडियन एअर फोर्सने वापरलेली राफेल विमानं उपयुक्त नाहीत, असा तर्क चिनी दूतावासातील डिफेन्स अटाचेने लावला. अन्य देशांच्या डिफेन्स अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चिनी शस्त्रांना प्रमोट करण्याचा, त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सच्या इंटेलिजन्स रिपोर्टमधून हा खुलासा झाला.

भारताची भूमिका काय?

चीनचा कायमस्वरुपी मित्र पाकिस्तानने दावा केलेला की, ऑपरेशन सिंदूरवेळी त्यांनी भारताची तीन राफेल फायटर जेट्स पाडली. राफेल विमानांची निर्मिती करणारी कंपनी दसॉ एविएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी पाकिस्तानचे हे दावे फेटाळून लावले होते. भारताचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी शांघरी-ला डायलॉगच्या पार्श्वभूमीवर एका इंटरव्यूमध्ये पाकिस्तानचा तीन राफेल विमानं पाडल्याचा दावा फेटाळून लावला होता. हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

राफेलमुळे काय शक्य झालं?

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तान सोबतच्या संघर्षात भारताने राफेल विमानांचा वापर केला होता. भारताने राफेलद्वारे भारताच्या सीमेत राहूनच पाकिस्तानवर अचूक प्रहार केले होते. राफेलची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी पाकिस्तान आणि चीनने कॅम्पेन सुरु केल्याचा फ्रान्सचा दावा आहे.