वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या एकुलत्या एक लेकाचे निधन, मुलाच्या निधनानंतर निर्णय घेत सोशल मीडियावर…
वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मुलाचे निधन. स्कीइंग करताना झालेल्या अपघातानंतर घेतला अखेरचा श्वास. वडिलांनी लिहिली भावूक पोस्ट.

वेदांता समूहाचे अध्यक्ष आणि देशातील नामवंत उद्योगपती अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे बुधवारी अमेरिकेत दुर्दैवी निधन झाले. स्कीइंग करताना झालेल्या अपघातानंतर त्यांना न्यूयॉर्कमधील Mount Sinai Hospital येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे देश-विदेशातील उद्योगविश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल अग्रवाल यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत अग्निवेश यांना स्पोर्ट्समन, संगीतप्रेमी आणि उत्तम नेतृत्वगुण असलेला व्यक्ती असल्याचे म्हटले. ‘माझ्यासाठी तो केवळ मुलगा नव्हता तर माझा जिवलग मित्र, माझा अभिमान आणि माझं संपूर्ण जग होता अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अग्निवेश अग्रवाल करिअर
अग्निवेश अग्रवाल यांचा जन्म 3 जून 1976 रोजी बिहारमधील पटना येथे झाला होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण राजस्थानमधील नामांकित मेयो कॉलेज अजमेर येथून पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी वेदांता समूहात प्रवेश केला आणि समूहातील विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
अग्निवेश यांनी हिंदुस्तान झिंक या कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम पाहिले. 2019 मध्ये हे पद सोडल्यानंतर ते वेदांता समूहाशी संलग्न असलेल्या तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्या संचालक मंडळात सहभागी झाले. कंपनीच्या विस्तार आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
याशिवाय त्यांनी ट्विन स्टार इंटरनेशनल लिमिटेड, स्टेरलाइट डिस्प्ले यांसारख्या वेदांता समूहाच्या उपकंपन्यांमध्येही संचालकपद भूषवले. इतकंच नाही तर त्यांनी Fujeirah Gold FZC या यूएईस्थित मेटल रिफायनिंग कंपनीची स्थापना केली होती. जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते.
पत्नीचा बंगालमधील श्रीमंत उद्योगघराण्याशी संबंध
अग्निवेश अग्रवाल यांचे लग्न पूजा बांगुरसोबत झाले होते. पूजा बांगुर या पश्चिम बंगालमधील अत्यंत श्रीमंत उद्योगघराण्यातील असून त्या श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक हरी मोहन बांगुर यांची कन्या आहेत. त्यांचे आजोबा बेनू गोपाल बांगुर हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मानले जातात. त्यांची संपत्ती सुमारे 55 हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
तर अग्निवेश अग्रवाल यांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत अचूक आकडेवारी उपलब्ध नसली तरी त्यांचे वडील अनिल अग्रवाल हे भारतातील आघाडीचे अब्जाधीश आहेत. अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती सुमारे 2.36 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
