भारताशी पंगा जस्टिन ट्रूडो अडचणीत, नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर आता फोडले खापर या लोकांवर

justin trudeau: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कॅनडातील कोणत्याही गुन्हेगारी कृतीशी संबंधित असल्याचे कॅनडा सरकारने सांगितले नाही किंवा त्यांना माहितीही नाही. या सर्व गोष्टी खोट्या आहेत आणि तर्कावर आधारित आहे.

भारताशी पंगा जस्टिन ट्रूडो अडचणीत, नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर आता फोडले खापर या लोकांवर
PM Modi-justin trudeau
| Updated on: Nov 24, 2024 | 3:25 PM

भारताशी पंगा घेतल्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन पियरे जेम्स ट्रूडो अडचणीत आले आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर अनेक आरोप केले. या प्रकरणात माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे नाव घेतले. त्यानंतर जस्टिन ट्रूडो यांना कशा पद्धतीने स्पष्टीकरण करावे, हे कळत नाही. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्याच गुप्तचर विभागावर या प्रकरणाचे खापर फोडले. ते म्हणाले, ही एक अविश्वसनीय आणि गुन्हेगारी लिकींग आहे.

काय म्हणाले जस्टीन ट्रुडो

खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांना होती, असे कॅनडाच्या प्रसारमाध्यमांमध्ये म्हटले होते. ब्रॅम्प्टनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रुडो म्हणाले, हे दुर्दैवी आहे की गुन्हेगार सतत गोष्टी मीडियाला लीक करत आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये अशी विधाने करणारे कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी आम्ही तपास सुरू केला आहे. त्या लोकांच्या परकीय शक्तींशी संगनमत आहे का?

कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार नताली जी ड्रौइन यांनी गुरुवारी सांगितले की, कॅनडाच्या सरकारला अशा कोणत्याही लिंकची माहिती नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कॅनडातील कोणत्याही गुन्हेगारी कृतीशी संबंधित असल्याचे कॅनडा सरकारने सांगितले नाही किंवा त्यांना माहितीही नाही. या सर्व गोष्टी खोट्या आहेत आणि तर्कावर आधारित आहे.

काय होती माध्यमांमधील ती बातमी

डेली ग्लोब आणि मेलमध्ये मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला. यामध्ये एका अज्ञात सुरक्षा अधिकाऱ्याचा हवाला देत पंतप्रधान मोदींसह भारतातील उच्च अधिकाऱ्यांना निज्जर यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती होती, असे म्हटले आहे. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, मीडिया रिपोर्ट्सवर भाष्य केले जात नाही. पण एका वृत्तपत्राच्या बातमीत कॅनडाच्या सरकारी सूत्रांचा हवाला देऊन ज्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत ते पाहता हे फेटाळणे आवश्यक आहे. या वृत्तांमुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडतील.