
Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के आयातशुल्कानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगलेच ताणले आहेत. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवावे यासाठी ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ अस्त्र उगारलेले आहे. भारताने मात्र भारताच्या दबावाला न जुमानता रशियासोबतचे व्यापारविषयक संबंध कायम ठेवले आहेत. तसेच आपला शेजारी असलेल्या चीन या देशाशीही भारताने सलगी वाढवलेली आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांची कानउघडणी करणारे मत अमेरिकेतीलच एका महत्त्वाच्या व्यक्तीने व्यक्त केले आहे. अमेरिकेला भारताची कशी गरज आहे, याबाबत या व्यक्तीने सविस्तर सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांच्या माजी सल्लागार मेरी किसेल यांनी ट्रम्प यांच्या चुकांवर बोट ठेवले आहे. अमेरिकेसाठी भारत कशा पद्धतीने गरजेचा आहे, याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले आहे. भारत आणि चीन यांच्यातील जवळीक वाढत असताना किसेल यांच्या या मताला आता फार महत्त्व आले आहे. हिंद-पॅसिफिक (इंडो-पॅसिफिक) महासागर क्षेत्रात चीनचे दिवसेंदिवस प्रस्थ वाढत आहे. हा प्रभाव कमी करायचा असेल तर अमेरिकेला भारताची मदत लागेल. हा प्रभाव भारताच्या मदतीशिवाय कमी होऊ शकत नाही, असे मत किसेल यांनी व्यक्त केले आहे.
मेरी किसेल यांनी नुकतेच फॉक्स न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले. अमेरिका चीनला आपला सर्वात मोठा शत्रू समजत असेल तर आपल्याला भारताची गरज लागेल. आपण हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनशी एकटे दोन हात करू शकत नाही. अमेरिकेला फक्त ऑस्ट्रेलिया, जपान दे दोनच देश नव्हे तर भारतासारख्या देशाचीही गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मेरी किसेल यांच्या या विधानानंतर आता डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफ लादून चूक तर करत नाहियेत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतावर टॅरिफ लावून अमेरिका एका प्रकारे चीनलाच बळकटी देत आहे का? असेही विचारले जात आहे.