
America Shutdown : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध यशस्वीपणे थांबवलेले आहे. हे युद्ध थांबवण्यात ट्रम्प यांची शिष्टाई कामाला आली आहे. मात्र त्यांच्या स्वत:च्याच देशातील अडचणी मात्र अद्याप कायम आहेत. सध्या अमेरिकेत शटडाऊन आहे. या शटडाऊनमुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. शटडाऊनमुळे शासकीय कार्यालयांना वित्तपुरवठा होत नाहीये. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढवणारा एक इशारा ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पार्टीचे स्पिकर माईक जॉन्सन यांनी इशारा दिला आहे. त्यांनी केलेले हे विधान खरे ठरले तर सरकारी नोकरांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून शटडाऊन चालू आहे. हीच बाब लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाचे स्पिकर माईक जॉन्सन यांनी अमेरिकेतील हा सर्वात मोठा शटडाऊन ठरू शकतो, असा इशारा दिला आहे. जोपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आरोग्यासंदर्भातील तरतुदींचा आपला हट्ट सोडणार नाहीत, जोपर्यंत निधी वितरण सुरू होत नाही तोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होणार नाही, असेही जॉन्सन यांनी सांगितले.
सध्या अमेरिकेत शटडाऊनचा 13 वा दिवस आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स यांनी या शटडाऊनच्या काळात भविष्यात मोठी नोकरकपात होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे सरकारी नोकरदार वर्गामध्ये सध्या अस्वस्थता आहे. यावर जॉन्सन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शटडाऊनच्या दिशेने जात आहोत, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. सध्यातरी शटडाऊनवर कोणताही तोडगा निघताना दिसत नाहीये.
त्यामुळेच पुढच्या काळात हा शटडाऊन असाच लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारतर्फे वित्तीय पुरवठाच होत नसल्याने आता वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. वेगवेगळी वस्तूसंग्रहालये, संस्कृतिक भावबंध जपणाऱ्या संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. विमानतळावरही या शटडाऊनचा परिणाम दिसतो आहे. या शटडाऊनमुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
अमेरिकेत गेल्या एक ऑक्टोबरपासून शटडाऊन सुरू झालेला आहे. शटडाऊन सुरू होताच, सरकारच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. अनेक सरकारी कामं करताना अडथळा येत आहे. निधी विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने हे शटडाऊन सुरू झाले आहे. याचा शेवट नेमका कधी होणार? याची निश्चित तारी ख सध्यातरी कोणीही सांगत नाहीये. मात्र शटडाऊनचा काळ जसा-जसा वाढतोय, तसे तसे अमेरिकेतील शासकीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढत आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.