
गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले. अशातच आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी कॅनडा भारताला खूष करण्याचा प्रयत्न करत आहे. या अंतर्गत कॅनडा 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याचे नागरिकत्व रद्द करण्याची तयारी करत आहे. याबाबत राणाला कॅनडाच्या सरकारने माहिती दिली आहे. तहव्वुर राणा सध्या भारतात तुरुंगात आहे. तो मूळ पाकिस्तानी वंशाचा असून त्याला 2001 मध्ये कॅनेडाचे नागरिकत्व मिळाले होते. मात्र हे नागरिकत्व मिळवताना तो खोटं बोलवल्याचा आरोप त्याच्यावर आहे, त्यामुळे आता त्याचे नागरिकत्व रद्द होणार आहे.
कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तहव्वुर राणा नागरिकत्वासाठी अर्ज करताना खोटे बोलला होती. 2000 साली त्याने नागरिकत्वासाठी अर्ज केला तेव्हा त्याने गेल्या चार वर्षांपासून ओटावा आणि टोरंटोमध्ये राहण्याचा दावा केला होता, मात्र हा दावा खोटा ठरला आहे. तसेच त्याने फक्त तहव्वुरने फक्त सहा दिवसांसाठी कॅनडाबाहेर असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावाही खोटा ठरला आहे. इमिग्रेशन विभागाने सांगितले की, नागरिकत्व मिळवण्यापूर्वी तहव्वुरने आपला सर्व वेळ शिकागोमध्ये घालवला होता, तिथे त्याने संपत्ती देखील कमावली होती.
इमिग्रेशन विभागाने फसवणूक आणि बनावटगिरीचा संपूर्ण अहवाल तयार केला असून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. या पुराव्यांच्या आधारे इमिग्रेशन विभागाला नागरिकत्व रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर तहव्वुर राणाचे नागरिकत्व रद्द केले जाणार आहे.
26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर तहव्वुर राणावर हा सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कॅनडाच्या सरकारने त्याची पाठराखण केली होती. कॅनडाने तहव्वुर राणाला पाठिंबा दिला होता, मात्र आता सरकारने भूमिका बदलली असून त्याचे नागरिकत्व रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, तहव्वुर राणा सध्या भारतीय तुरुंगात कैद आहे. तो स्वतःसाठी कॉन्सुलर अॅक्सेसची विनंती करत आहे. तो कुटुंबाला भेटण्याची परवानगी मागत आहे. जर कॅनडाने त्याला पाठिंबा दिला असता तर भारतासाठी मोठा पेच निर्माण झाला असता, मात्र आता तसे होणार नाही. आता आगामी काळात तहव्वुर राणाबाबत भारत सरकार कठोर निर्णय घेऊ शकणार आहे. ही भारतासाठी आनंदाची बाब आहे.