
भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जातं, हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलं आहे. भारतीय सैन्य दलाकडून 7 मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आलं. या हल्ल्यात दहशतवाद्यांची 9 तळं उद्धवस्त करण्यात आली. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर आता चीनचीही चांगलीच टरकली आहे. भारताच्या या कारवाईनंतर आता चीननेही त्यांची भूमिका बदलली आहे. चीनने पाकिस्तानची साथ सोडली आहे.
पाकिस्तानसाठी कायम सहकार्य करण्याची भाषा करणाऱ्या चीनने आता त्यांनाच सल्ला दिला आहे. पाकिस्तानने आता संयमाने घ्यावं, असा सल्ला चीनने दिला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, असं पाकिस्तानने काही करु नये, असं चीनने पाकिस्तानला म्हटलं आहे.
“भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. भविष्यातही दोघेही शेजारी राहतील. अशा परिस्थितीत दोघांनीही हा प्रश्न शांततेने सोडवावा. शांततेसाठी आणि व्यापक हितासाठी काम करण्याची गरज आहे” असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी राजदूतांनी 3 दिवसांपूर्वीच इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत चिनी राजदूतांनी पाकिस्तानला बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. मात्र भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता चीनने 3 दिवसांतच आपली भूमिका बदलली आहे.
पाकिस्तानने आतापर्यंत उचललेली पावलं योग्य आहेत, असं चिनी राजदूतांचं म्हणणं होतं. चीनने पाकिस्तानला दिलेल्या या पाठींब्याची जगभरात चर्चा होत होती. मात्र भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनने ज्या पद्धतीने भूमिका घेतली, त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका समजला जात आहे.
“आम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे चीनचे शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो”, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
“शांततेसाठी आणि व्यापक हितासाठी आम्ही दोन्ही पक्षांना (भारत आणि पाकिस्तान) शांतता राखावी आणि संयम बाळगावा. तसेच ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळेल असं काही करु नये”, असं आवाहन चीनकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर‘अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानने 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावंर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.