
अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर तणावाचा वातावरण आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांविरुद्ध लढण्यासाठी चीनने भारताची मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मार्चमध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रातील माहिती आता समोर आली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार जिनपिंग यांनी या पत्राद्वारे अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी भारताकडे पाठिंबा मागितला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ब्लूमबर्गने या पत्राबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जिनपिंग यांनी मार्च 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हे गुप्त पत्र लिहिले होते. याद्वारे चीनने ट्रम्प यांच्या टॅरिफशी कसे लढायचे याची माहिती भारताला दिली होती. त्यामुळे आता ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. तसेय या पत्रात भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याबाबतही भाष्य केले होते. तसेच या पत्रात एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. ही व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावेल असं चीनने म्हटले होते. मात्र या व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही.
ब्लूमबर्गने भारतीय राजदूतांच्या हवाल्याने म्हटले की, ‘माार्चमध्ये चीन आणि अमेरिकेत टॅरिफ वॉर सुरु होते. जिनपिंग यांना या लढाईत माघार घ्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी भारताशी संपर्क केला होता, मात्र चीन ही माहिती गुप्त ठेवू इच्छित होता. त्यामुळे या पत्राची माहिती सार्वजनिक झाली नव्हती. तसेच जिनपिंग यांनी अमेरिकेची व्यापार धोरणे ही चीनच्या हितसंबंधांना हानी पोहोचवणारी आहेत असं म्हटलं होतं.
दरम्यान, मार्चमध्ये आलेल्या या पत्राला भारताने जून 2025 पर्यंत कोणतेही उत्तर दिले नव्हते, तसेच या पत्राबाबत कोणतेही अधिकृत विधान केले नव्हते. दोन्ही देशांमधील टॅरिफ वॉर संपल्यानंतर भारताने चीनशी संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला होता. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल चीनला गेले होते, तसेच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हेही दिल्लीला आले होते.
ब्लूमबर्गने अमेरिकेच्या दोन चुकांमुळे भारत आणि चीनमधील जवळीक वाढल्याचे म्हटले आहे. पहिली चूक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी काही दावे केले होते, त्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केली होती. दुसरी चूक म्हणजे ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले असून भारत आणि चीनमधील जवळीक वाढली आहे.