
ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उरी हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला. हा प्लांट लाइन ऑफ कंट्रोल जवळ आहे. पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न फसला. काहीही नुकसान झालं नाही. भारताच्या सेंट्रल इंडस्ट्रीयल स्कियुरिटी फोर्सने हा हल्ला परतवून लावला होता. भारतासाठी रणनितीक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी CISF वर आहे. त्यावेळी उरी हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटच्या सुरक्षेसाठी 19 जवान तैनात होते. त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर ही बाब समोर आली. पाकिस्तानकडून प्लांटवर ड्रोन्स डागण्यात आले. हे सर्व ड्रोन्स हवेतच नष्ट केले. त्याचवेळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु असताना नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं.
नवी दिल्लीत CISF च्या मुख्यालयात मंगळवारी कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या 19 जवानांना प्रतिष्ठेच्या डीजी डिस्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 6-7 मे च्या राजी भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी लष्कराने भारतीय भागात अंदाधुंद गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणांना धोका निर्माण झालेला. यात उरी हायड्रो पावर प्रोजेक्ट होता. जवळपासच्या नागरिकांच्या जिवीताला धोका होता. अचानक अशी परिस्थिती उदभवल्यानतंर LOC पासून काही किलोमीटर अंतरावर प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या CISF चे जवान पुढे होते.
पराक्रमाची गोष्ट आता समोर आली
मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असताना कमांडट रवी यादव यांच्या नेतृत्वाखाली टीमने प्रकल्प आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी बचावात्कम उपायोजना सुरु केल्या असं सीआयएसएफकडून सांगण्यात आलं. युद्धाचा हा थरार सुरु असताना, CISF ने पाकिस्तानने डागलेले ड्रोन्स पाडले. सगळी शस्त्रास्त्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली जेणेकरुन संभाव्य मोठं नुकसान टळता येईल. संकटकाळात देशाच्या या संपत्तीचं कुठलही नुकसान पोहोचू न देता संरक्षण केलं. रहिवाशी संकुलाजवळ तोफगोळे येऊन पडले. त्यावेळी दारोदार जाऊन महिला, मुलांना सुरक्षित स्थळी हलवलं. त्या रात्री CISF ने दाखवलेल्या पराक्रमाची गोष्ट आता समोर आली आहे.