तेलापासून साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं; आता थेट खिसा रिकामा!
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची झळ भारताला बसायला सुरुवात झाली आहे. एफएमसीजी कंपन्या आता आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. तशी चर्चा चालू झाली आहे.

FMCG Product Price May Increase : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ्या पातळीवर फटका बसत आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जलवाहतूक ठप्प पडली असून भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी कच्चा माल कमी पडत आहे. याच सर्व गोष्टींचा फटका बसायला आता सुरुवात झाली आहे. भारताला महागाईचे चटके बसायला लागले आहेत. असे असतानाच आता फास्ट मुव्हिंग कन्झ्यूमर गुड्स अर्थात एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. असे झाले तर तुमच्या रोजच्या वापरताली साबण, तेल तसेच इतर अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.
किमती 3 ते 4 टक्क्यांनी वाढणार?
मिळालेल्या माहितीनुसार एफएमसीजी कंपन्या वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या ब्रोकरेज फर्मने आपल्या एका रिपोर्टमध्ये तसा दावा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ तसेच जागतिक पातळीवर घसरलेला रुपया या दोन गोष्टींमुळे उत्पादनास लागणाऱ्या कच्च्या मालाचा आयात खर्च वाढला आहे. त्यामुळे अशा स्थितीत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत स्थिर ठेवणं कठीण होत आहे. त्यामुळेच कच्चा माल महागल्यामुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पहिल्या तिमाहीत किमती 3 ते 4 टक्क्यांनी वाढू शकतात.
शाम्पू, तेल, बिस्कीट महागण्याची शक्यता
वित्त वर्ष 2025-26 मध्ये एफएमसीजी कंपन्यांकडे असलेल्या कच्च्या मालाच्या साठ्यामुळे उत्पादन घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु आता कच्चा माल कमी पडू लागल्याने तसेच कच्च्या मालाची किंमत वाढल्याने हा भाववाढीचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय प्रत्यक्षात घेण्यात आला तर FMCG कंपन्यांकडून तयार केले जाणारे शाम्पू, तेल, बिस्कीट आदी उत्पादनांची किंमत वाढू शकते. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे