
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ग्रीनलँन्डवर ताबा मिळवण्याची धमकी दिली होती, त्यानंतर आता डेन्मार्कने मोठं पाऊल उचललं आहे. डेन्मार्कने आता तब्बल 8.5 अब्ज डॉलर म्हणजे 7,5,411 कोटी रुपयांची लढाऊ विमानांची डील करण्याची योजना बनवली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँन्ड अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची धमकी दिल्यानंतर आता डेन्मार्कने हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर ग्रीनलँडमध्ये खळबळ उडाली होती.
दरम्यान याबाबत बोलताना डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही ही जी शस्त्रांमध्ये, लढाऊ विमानांमध्ये गुंतवणूक करणार आहोत ती अमेरिकेला हे दाखवून देण्यासाठीच आहे की, डेन्मार्कमध्ये ग्रीनलँड सुरक्षीत आहे, आम्ही ग्रीनलँडच्या सुरक्षेला गांभीर्यानं घेतलं आहे. तर दुसरीकडे नाटो देश आणि अमेरिकेकडून असा आरोप केला जात आहे की, या क्षेत्राचा चीन आणि रशियाकडून कारवायांसाठी वापर केला जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं होती की, ज्या बेटांवर विपुल प्रमाणात खनिजांचा साठा आहे, अशी बेटं खरेदी करण्याची आमची इच्छा आहे. दरम्यान दुसरीकडे आता डेन्मार्क हा ग्रीनलँडच्या सुरक्षेसाठी चार अब्ज डॉलर रुपयांचा खर्च करणार आहे, ज्यामध्ये दोन नवीन आर्क्टिक जहाजे, लढाऊ विमाने आणि ड्रोन खरेदी किंवा भाड्याने घेण्याची योजना आहे, हा अमेरिकेसाठी डेन्मार्कचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या गुंतवणुकीमध्ये आर्किट कमांडसाठी एक नवीन मुख्यालय, तसेच वेस्ट ग्रीनलँडमध्ये एक पूर्वसूचना देणाऱ्या रडारचा देखील समावेश आहे.
जानेवारी 2025 मध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता, या सर्व्हेनुसार ग्रीनलँड मधील बहुतांश लोकांनी ग्रीनलँडचं अमेरिकेमध्ये विलिनीकरण करण्यास विरोध दर्शवला होता. तर मार्चमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी देखील ग्रीनलँडचा दौरा केला होता, या दौऱ्यामध्ये त्यांनी ग्रीनलँडमधील लोकांनी डेन्मार्कशी असलेले सर्व संबंध तोडावेत आम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊ असं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर आता डेन्मार्कने मोठं पाऊल उचललं असून, शस्त्रांमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली आहे, यामुळे आता डेन्मार्क आणि अमेरिकेमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.