
Israel And Hamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच झटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी 20 कलमी शांतता प्रस्तावही आणला आहे. विशेष म्हणजे या शांतत प्रस्ताशी इस्रायल आणि हमास या दोघांनीही सहमती दाखवली होती. आता मात्र अचानक हमासने आपली भूमिका बदलली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हमासला आता या शांतता करारातील काही गोष्टी मान्य नाहीत. त्यामुळेच हमासने या शांतता करारावर सही करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. हमासची हीच भूमिका आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा झटका मानली जात आहे.
हमासच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने तर थेट टोकाची भूमिका घेतली आहे. आता इस्रायलसोबत पुन्हा युद्ध होणार असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या शांतता प्रस्तावावर हमास सही करणार नाही, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. हमासच्या राजकीय ब्युरोचे सदस्य होसम बदरान यांनी एएफपी या वृत्तसंस्थेने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या 20 कलमी शांतता प्रस्तावाअंतर्गत हमासने गाझा पट्टी सोडून जाण्याची अट आम्हाला मान्य नाही. सोबतच शस्त्र टाकून देण्याची अटदेखील आला मान्य नाहीच, अशी भूमिका स्पष्ट केली.
आम्ही या शांततेसाठी कतार आणि इजिप्त या मध्यस्थांमार्फत काम करत आहोत. अधिकृतपणे सही करण्याच्या प्रक्रियेत आम्ही सहभागी होणार नाहीत, असेही बदरान यांनी स्पष्ट केले. तसेच हमास आपली शस्त्रं टाकून देणार का? असा प्रश्न विचारल्यावर आमच्याजवळ असलेली शस्त्रे ही पूर्ण पॅलेस्टिनी नागरिकांकडची शस्त्रं आहेत. शस्त्र टाकून देण्याचा प्रश्नच येत नाही, असे बदरान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शांतता प्रस्तावाच्या अंमलबजावणीला येत्या 13 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. इस्रायल कैद असलेल्या 2000 पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करणार आहे. तर हमासदेखील आपल्याकडच्या 20 इस्रायली नागरिकांची सुटका करणार आहे. पण या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधीच हमासने सही करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता ट्रम्प नेमकं काय करणार? समोर उभ्या राहिलेल्या या नव्या आव्हानाला ते कसे तोंड देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.