
बांगलादेशात सध्या पाकिस्तानी राजदूताचे एक प्रकरण चांगलेच गाजत आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या राजदूताला ढाक्यातून पळ काढावा लागला आहे. पाकिस्तानचे राजदूत सैयद मारूफ यांना ढाक्यातून गायब व्हावे लागले आहे. 11 मे रोजी ढाक्यातून पळ काढलेले मारूफ हे इस्लामाबाद विमानतळावर टी-शर्ट आणि जीन्सवर दिसले. एका ललनेमुळे पाक आणि बांगलादेशात सध्या गहजब उडाला आहे. तर ढाक्यात एका 23 वर्षीय मुलीने मारूफ यांना चांगलाच इंगा दाखवल्याची खरपूस चर्चा रंगली आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकला मारूफ
नॉर्थ-ईस्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मारूफ हा पाकिस्तानचा राजदूत आहे. बांगलादेशातील एका 23 वर्षीय मुलीच्या जाळ्यात तो अडकला. ही मुलगी एक बँकेत काम करत असल्याचे सांगण्यात येते. तर काहींच्या दाव्यानुसार, ती स्पाय आहे. दोघांमध्ये चांगलेच संबंध फुलले होते. पण अचानक काही तरी साक्षात्कार झाला आणि मारूफ याला आहे त्या कपड्यावर ढाक्यातून पळ काढावा लागला. तो थेट पाकिस्तानच पोहचला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये या प्रकरणावरून आरोपाच्या फैरी उडाल्या आहेत.
कोण आहे ती 23 वर्षांची मुलगी?
ही 23 वर्षांची तरुणी ढाका शहरात राहते. ती स्थानिक बँकेत काम करते. या मुलीचे आडनाव हक आहे. तिथल्या सोशल मीडियावर या मुलीसोबत मारुफचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हक या मुलीने केवळ मारूफ यालाच फॉलो केले आहे. या मुलीने तिच्या सोशल अकाऊंटवर एका बँकेची सहाय्यक संचालक असल्याचा दावा केला आहे. मारूफ ढाक्यातून पळाल्यानंतर या मुलीचे सोशल अकाऊंट बांगलादेशात ट्रेंड होत आहे.
विशेष म्हणजे 2024 मध्ये शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात आले. त्यापूर्वी एक वर्षाअगोदर मारूफ याची बांगलादेशात राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती. 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशाने पाकिस्तानकडून तांदळाची खरेदी केली होती. त्यामुळे मारूफचे कौतुक झाले होते. मारूफच्या आडून पाक बांगलादेशात नेटवर्क मजबूत करत होता.
सौदीचा राजदूत पण हनी ट्रॅपचा शिकार
मारूफ पळाल्याच्या एक महिन्यापूर्वीच सौदी अरबचा राजदूत सुद्धा हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. या प्रकरणात बांगलादेशाच्या पोलिसांनी थेट कारवाई केली होती. कारवाई अंतर्गत राजदुताशी संबंधित मॉडेल मेघना हिला पोलिसांनी अटक केली होती. तर सौदीने राजदूताला परत बोलावून घेतले होते. त्यानंतर सौदी आणि बांगलादेशाच्या संबंधावर चिंता व्यक्त होत होती.