सैन्य माघारी बोलवण्याच्या डेडलाईनवर भारताचे मालदीवला उत्तर
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडत चालले आहे. मालदीवमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन्ही देशामंधील वाद वाढला होता. अनेक भारतीयांनी मालदीवला जाण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर चीन दौरा करुन आलेल्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय सैन्य मागे घेण्याची भारताला विनंती केली होती.

India-maldive Row : मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव वाढला आहे. या तणावारदरम्यान मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू हे चीन दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी भारताला १५ मार्चपूर्वी आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. आता भारत सरकारने यावर उत्तर दिले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या मुद्द्यावर कोअर ग्रुपची 14 जानेवारी रोजी बैठक पार पडली होती. यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले होते. दोन्ही बाजूने तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचं त्यात म्हटले होते.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर बदलले आहेत. त्यांनी भारताला १५ मार्चपूर्वी मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना कोणालाच नसल्याचे म्हटले होते.
लाल समुद्रातील घडामोडींवर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. आम्ही सागरी नेव्हिगेशन आणि व्यापाराच्या स्वातंत्र्याला येथे महत्त्व देतोय. जे काही घडत आहे त्याचा परिणाम इतरांवर देखील होऊ शकतो.
एस जयशंकर यांच्या इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, आम्हाला या संपूर्ण परिस्थितीची चिंता आहे. शिपिंग हे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे. तेथे उपस्थित असलेले आपले हवाई दल केवळ आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी नाही तर इतरांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहे.
मालदीवमध्ये भारतीय सैन्य आहे तैनात
भारत आणि चीन यांच्यासाठी मालदीव हा खूप महत्त्वाचा देश आहे. 2013 पासून लामू आणि अड्डू बेटांवर भारतीय सैनिक तैनात आहेत. मालदीवमध्ये भारतीय नौसैनिकही तैनात आहेत. भारतीय नौदलाने येथे पाळत ठेवण्यासाठी रडार स्थापित केले आहेत. मुइज्जू यांनी म्हटले होते की, हिंद महासागर द्वीपसमूहातील परदेशी लष्करी उपस्थिती दूर करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.
गेल्या वर्षी मालदीवचे अध्यक्ष झाल्यानंतर मुइज्जू यांनी भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली होती. स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी आपला देश कोणत्याही ‘परकीय लष्करी उपस्थितीपासून’ मुक्त आहे याची खात्री करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत यावर त्यांनी भर दिला होता.
मोहम्मद मुइज्जू यांनी निवडून येण्याआधी निवडणुकीमध्ये ‘इंडिया आउट’ची घोषणा दिली होती. भारताने मालदीवला जे हेलिकॉप्टर भेट दिले आहेत. त्याच्या देखभालीसाठी भारतीय सैन्य तेथे उपस्थित आहेत.
