
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेनं इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा केली. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध विराम झाल्यामुळे मध्यपूर्वेमधील मोठं संकट टळलं आहे. अमेरिकेला देखील दिलासा मिळाला आहे.दरम्यान इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाल्यानंतर आता अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमुळे अमेरिकेची चिंता चांगलीच वाढली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम करणं हे डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडू शकतं, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
द टेलीग्राफ ब्रिटनने दिलेल्या एका वृ्त्तानुसार सुरक्षा तज्ज्ञांकडून असा दावा करण्यात आला आहे की, इराणमुळे अमेरिकेला मोठा धोका होण्याची शक्यता आहे. इराण आपल्या स्लीपर सेल्सच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये मोठी कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बातमी ट्रम्प आणि अमेरिकेच्या संपूर्ण यंत्रणेसाठी आता मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जातं आहे. सुरक्षा तज्ज्ञांकडून असाही दावा करण्यात आला आहे की, हे स्लीपर सेल्स सामान्य माणसांचं आयुष्य जगतात आणि पाहिजे तेव्हा सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे त्यांची ओळख पटवणं एक मोठं आव्हान असणार आहे.
स्लीपर सेल म्हणजे नेमकं काय?
स्लीपर सेल म्हणजे असे लोक असतात, ज्यांचं वर्तन हे सामान्य नागरिकांप्रमाणेच असंत, ते नोकरी करतात, नागरिकांमध्ये मिळून मिसळून वागतात. मात्र त्याचवेळी ते एखाद्या कोणत्या तरी संस्थेसोबत जोडले गेलेले असतात.वेळ अल्यानंतर ते त्या संस्थेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी काम करतात. त्यांना ग्रीन सिग्नल मिळताच ते एखाद्या समुदायावर किंवा महत्त्वाच्या संस्थेवर हल्ला करू शकतात, यामध्ये प्रचंड प्रमाणात जीवतहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते.
रिपोर्टमध्ये काय?
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, इराणचे अनेक स्लीपर सेल अमेरिकेमध्ये लपून बसलेले आहेत. असा देखील दावा करण्यात येत आहे की, या स्लीपर सेलकडून अमेरिकेमध्ये मोठा सायबर किंवा ड्रोन हल्ल्याची तयारी देखील करण्यात आली आहे, जर या स्लीपर सेलकडून हल्ला करण्यात आला तर त्याची मोठी किंमत अमेरिकेला चुकवावी लागणार आहे.