Israel-Iran War News : आयर्न डोम फेल ! तेल अवीवमध्ये रात्रभर मिसाईल्सचे तांडव
Iran Attack on Israel : कालपासून अर्थात 13 जूनपासून इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले. इस्रायलने इराणवर हल्ला केला असून त्यामध्ये इराणचे अनेक वरिष्ठ कमांडर आणि शास्त्रज्ञ ठार झाले. प्रत्युत्तरादाखल इराणने सुमारे 100 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे तेल अवीवमध्ये खळबळ माजली आहे.

Israel-Iran War News : गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास असा संघर्ष सुरू असतानाच आता इस्राईल आणि इराणमध्येही युद्धस्थिती निर्माण झाली आहे. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने मोठे हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही देशांत प्रचंड हिसाचार सुरू आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे मिडिल ईस्ट हा धुरात झाकोळला गेला आहे. काल, (शुक्रवार 13 जून) इस्रायलने इराणवर हल्ला करून युद्ध सुरू केले. इस्रायलने इराणचे लष्करप्रमुख, सर्वोच्च कमांडर आणि अगदी अणुशास्त्रज्ञांनाही सोडलं नाही, त्यांना ठार मारले.
मात्र य़ा हल्ल्याला इराणनेही चोख प्रत्युत्तर दिलं. इराणने अशी ताकद दाखवली की इस्रायलचा आयर्न डोमही त्याच्यासमोर असहाय्य झाल्याचं दिसून आलं. इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने 13 जूनच्या रात्री 100 हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर तेल अवीवमध्ये गोंधळ उडाला. रात्रीच्या अंधारातही तेल अवीवचे आकाश विजांच्या कडकडाटाने उजळून निघाले. तेल अवीवमध्ये रात्रभर इराणी क्षेपणास्त्रांचं तांडव दिसत होतं.
खरं तर, इस्रायल आणि इराणमधील तणावाने 13 जूनच्या रात्री युद्धाचे रूप धारण केले. इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लाईनला इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिसने प्रत्युत्तर दिले. त्या अंतर्गत इराणने तेल अवीव आणि जेरुसलेमवर 100 हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. इराणी हल्ल्याने इस्रायलच्या प्रसिद्ध हवाई संरक्षण प्रणाली आयर्न डोम आणि डेव्हिड स्लिंगलाही कमकुवत केलं. इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं अशा प्रकारे डागली की आयर्न डोम आणि डेव्हिड स्लिंगही त्यांना पूर्णपणे रोखण्यात अयशस्वी झाले. यानंतर तेल अवीवच्या आकाशात बॉम्बहल्ला सुरू झाला.
तेल अवीवच्या आकाशात तांडव
इराणी क्षेपणास्त्रांमुळे तेल अवीवच्या आकाशात रात्रभर तांडव सुरू होतं. सर्वत्र स्फोट सुरू होते. पळा-पळा असा आक्रोश काही ठिकाणी सुरू होता तर काही ठिकाणी वाचवा-वाचवा च्या किंकाळ्या ऐकून येत होत्या. इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये रात्रभर सायरन वाजत होते आणि लाखो नागरिकांना बॉम्ब निवारक केंद्रांमध्ये आश्रय घ्यावा लागला. इस्रायलला ज्या आयर्न डोमचा खूप अभिमान आहे, तो इराणी क्षेपणास्त्रांनी सहजपणे भेदला. तेल अवीवचे आकाश इराणी क्षेपणास्त्रांनी भरलेले होते. आकाशातून जणू काही क्षेपणास्त्रे आणि बॉम्बचा पाऊस पडत होता, असे चित्र सर्वत्र दिसत होतं. आयर्न डोम आणि डेव्हिड्स स्लिंग हे सुद्धा इराणी क्षेपणास्त्रांना तेल अवीवपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले. तेव्हाच इस्रायलला त्यांच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगण्यात आले.
मात्र, इराणच्या अनेक क्षेपणास्त्रांना आयर्न डोम आणि डेव्हिडच्या स्लिंगने आकाशात रोखले. त्यांना तेल अवीवपर्यंत पोहोचू दिले नाही. मात्र याच हवाई संरक्षण प्रणाली अनेक इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्यात अपयशी ठरल्या हेही तितकंच खरं आहे. इराणचा हा हल्ला थांबवला तोपर्यंत अनेक क्षेपणास्त्रांनी तेल अवीवला भस्मसात केले होते. इराणी हल्ल्यात इस्रायलचेही मोठे नुकसान झाले आहे. 65 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.