
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर मोठा भडका उडाला असून या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. कोणतेच देश आता माघार घेण्यास तयार नसून एकमेकांवरील हल्ले तीव्र केल्याने मोठा नरसंहार होत आहे. अनेकांचे जीव गेले, किती तळ, इमारती, शहरं उद्ध्वस्त झाली याला काही गणतीच नाही. दरम्यान या युद्धाचा परिणाम फक्त इराण- इस्त्रायल- अमेरिकेवर नाही तर संपूर्ण जगावर होता दिसत असून इतर देशांनाही याचा फटका बसत आहे.अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीवरही परिणाम झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांतील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
भारतातील अनेक नागरिक हे पर्यटनासाठी, फिरण्यासाठी म्हणून बाहेर गेले आहेत, काहींनी दुबईचाही दौरा केला. मात्र सध्या सुरू झालेल्या हल्ल्यांमुळे युद्धज्वर भडकला असून अनेक भारतीय हे दुबईमध्येही अडकल्याची माहिती समोर आली आहे. युद्धाच्या सावटामुळे त्यांना मायदेशी परतण्याची ओढ लागली असून संबंधित पर्यटन कंपन्यांकडून पर्यटकांची हॉटेल्समध्ये सोय करण्यात आली आहे. पर्यटनासाठी दुबईत गेलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी पर्यटन कंपन्यांची धडपड सुरू असून स्थानिक प्रशानासोबत समन्वय साधणं सुरू आहे. तसेच, युद्धापूर्वीच भारताबाहेर पडलेल्या पर्यटकांना अन्य देशांमध्ये पर्यटनाचा पर्याय पर्यटन कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अनेक भारतीय अडकले
केसरी टूर्सतर्फे दुबईत पर्यटनासाठी सुमारे 60 पर्यटक गेले आहेत. युद्ध सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी काही पर्यटकांचे काही गट अबुधाबीमध्ये होते. मात्र युद्ध सुरू होताच तेथील पर्यटकांना दुबईमध्ये हलवण्यात आलं. सद्यस्थितीत त्यांची दुबईमधील हॉटेलमध्ये सोय करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत अशी माहिती समोर आली आहे. तसेच टूर्स गाईड स्थानिक प्रशासनाच्या संपर्कातही असून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
इराण-इस्रायल संघर्षाचा विमानांना फटका, शेकडो उड्डाणं रद्द
दरम्यान इराण-इस्रायल संघर्षाचा 125 विमानांना फटका बसला असून विमान उड्डाणं रद्द झाल्याने हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले आहेत. इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. युद्धामुळे रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यत मुंबई विमानतळावरील 125 विमाने रद्द करण्यात आली. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. त्यामध्ये विद्यार्थी, खेळाडू, सामान्य नागरिक, पर्यटकांचा समावेश आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. यामुळे भारतातील प्रमुख विमानतळांसह मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रैंकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार-सोमवारची एअर इंडियाची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. एअर इंडियाने अडकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे इंडिगोनेही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील उड्डाणे रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. याचा परिणाम मुंबई-लंडन सेवेवरही झाला असून जवळपास 127 विमान सेवा बंद आहेत ज्यामध्ये येणारी 59 तर जाणारी 68विमानाचा समावेश होता. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान मध्यमार्गाने रविवारी मुंबईला उतरवण्यात आले.
2 मार्चपर्यंत एअर इंडियाची अनेक उड्डाणे स्थगित
मध्यपूर्वेतील सध्या असलेल्या अशांततेचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अनेक देशांमधील विमान कंपन्यांवर झाला आहे. एअर इंडियाने अनेक देशांमधील उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. एअर इंडियाने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. हे निलंबन भारतीय वेळेनुसार 2 मार्च 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत लागू राहील.
एअर इंडियाने 2 मार्च 2026 रोजी उत्तर अमेरिका आणि युरोपला जाणारी सहा उड्डाणं रद्द केली आहेत. उत्तर अमेरिका आणि युरोपला जाणारी एअर इंडियाची विमानं पर्यायी मार्गांचा वापर करतील.