
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. अशातच आता हे युद्ध संपवण्यासाठी इराणने अमेरिकेसोबत चर्चेसाठी सशर्त सहमती दर्शवली आहे. ही चर्चा पाकिस्तानमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण चर्चेसाठी तयार आहे, मात्र त्याने काही महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्याच्यावर सुरू असलेले हल्ले तात्काळ थांबवले जावेत आणि अमेरिका तसेच इस्रायल यांनी भविष्यात कोणताही हल्ला करणार नाहीत, याची हमी द्यावी. आता डोनाल्ड ट्रम्प हे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, युद्ध थांबवण्याच्या या मुद्द्यावर 29-30 मार्च रोजी पाकिस्तावातील इस्लामाबाद येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त सहभागी होणार आहेत. या देशांदरम्यानच्या चर्चेत मध्यस्थीचा रोडमॅप तयार केला जाईल. इराणने यापूर्वी अमेरिकेने सुचवलेला 15 सूत्रीय करार नाकारला होता. आता इराणने 5 अटी अमेरिकेने मान्य केल्यासच पुन्हा चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे.
पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी आपले राजनैतिक प्रयत्न अधिक वेगवान केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवर चर्चा करून तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिली आहे. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी अमेरिकेसोबतच्या बैठकीबाबत चर्चा केली. आता इस्लामाबादमध्ये तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे होत आहे, ज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून हे युद्ध थांबवण्याचे मार्ग शोधले जाणार आहेत.