
गेल्या काही काळापासून जगाने अनेक युद्ध पाहिली आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले होते. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले केले होते. त्यानंतर आता इस्रायली सैन्याने आणखी एका देशात हल्ले केले आहेत. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात नोव्हेंबर 2024 मध्ये युद्धबंदी झाली होती, मात्र आता तणाव आणखी वाढला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण आणि ईशान्य भागातील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.
लेबनॉनमध्ये केलेल्या या कारवाईबाबत इस्रायली लष्कराने म्हटले की, आम्ही हिजबुल्लाहचे लष्करी तळ, प्रशिक्षण शिबिरे आणि शस्त्रास्त्रांचे डेपोंवर हल्ला केला आहे. लेबनॉनच्या सरकारी एजन्सीने म्हटले की, हे हल्ले माउंट रिहानपासून सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या हर्मेल प्रदेशापर्यंत झाले. त्यानंतर काही वेळातच, दक्षिणेकडील तयबेह शहराजवळ एका कारवर ड्रोन हल्ला झाला. याच अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील वाद संपवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेत एका बैठकीचे आयोजन केले आले आहे. मात्र या बैठकीच्या एक दिवस आधी हे हवाई हल्ले झाले आहेत. या आधीही दोन्ही देशांच्या समितीत बैठक झाली होती. त्या बैठकीला लष्करी सदस्य असलेले अधिकारी हजर होते. मात्र आता दुसऱ्या बैठकीत काही नागरी सदस्यही असणार आहेत.
लेबनीज आर्मी कमांडर जनरल रोडोल्फ हायकल हे आज पॅरिसमध्ये अमेरिका, फ्रेंच आणि सौदी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. सीमावर्ती भागात सैन्य तैणात करण्यासाठी या देशांनी मदत करावी याबाबत या भेटीत चर्चा केला जाणार आहे. लेबनीज सरकारने असे म्हटले आहे की, या वर्षाच्या अखेरीस लिटानी नदीच्या दक्षिणेकडील भागात हिजबुल्लाहचे सशस्त्र दहशतवादी आहेत, त्यांना या भागातून हटण्यासाठी सैन्य प्रयत्नशील आहे.
दरम्यान, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध 8 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाले होते. हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला होता, त्यानंतर हिजबुल्लाहने हमासच्या समर्थनार्थ इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. त्यामुळे गेल्या सप्टेंबरमध्ये इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला केला होता. यामुळे हिज्बुल्लाहची ताकद कमी झाली होती. त्यानंतर आता इस्रायलने हवाई हल्ले वाढवले आहेत. आतापर्यंत या हल्लांमध्ये हिज्बुल्लाहच्या अनेक दहशतवाद्यांशिवाय 127 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.