Iran Israel War: इराणच्या भूमीत ‘मोसाद’च्या कमांडोजचा पराक्रम, 12 दिवसांच्या युद्धानंतर मोठी कबुली

इस्रायल संरक्षण दलाचे (IDF) प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झामीर यांनी एका व्हिडिओ निवेदनात मोठा खुलासा केला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

Iran Israel War: इराणच्या भूमीत मोसादच्या कमांडोजचा पराक्रम, 12 दिवसांच्या युद्धानंतर मोठी कबुली
Iran Israel War
| Updated on: Jun 27, 2025 | 5:02 PM

इराण आणि इस्रायल यांच्यातील 12 दिवसांच्या तीव्र युद्धानंतर इस्रायल संरक्षण दलाचे (IDF) प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झामीर यांनी एका व्हिडिओ निवेदनात मोठा खुलासा केला आहे. इस्रायलच्या कमांडो फोर्सेसनी इराणच्या भूमीत गुप्तपणे कारवाया करून मोठे यश मिळवले आहे. झामीर यांनी सांगितले की, “आम्ही इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतांना मोठा धक्का दिला, शेकडो लाँचर्स नष्ट केले आणि त्यांच्या सैन्यवृद्धी योजनांना लक्षणीय विलंब कसा होईल याचा डाव आखला. याशिवाय, आम्ही गुप्तचर, तांत्रिक आणि हवाई वर्चस्व मिळवले. आम्ही इराणच्या आकाशात आणि आम्ही निवडलेल्या प्रत्येक ठिकाणी अगदी सहज स्वतंत्र्यपणे कार्य करता येईल असे डाव आखले.”

नेमकं काय घडलं?

या यशामागे हवाई आणि जमिनीवरील कमांडो फोर्सेसच्या पूर्ण समन्वय आणि फसवणुकीच्या रणनीतीचा हात आहे, असे झामीर यांनी नमूद केले. “या फोर्सेसनी शत्रूच्या हद्दीत गुप्तपणे कारवाया केल्या आणि आम्हाला कार्यरत स्वातंत्र्य मिळवून दिले,” असे ते म्हणाले. मात्र, झामीर यांनी हे स्पष्ट केले नाही की, या कारवायांमध्ये मोसादच्या कमांडोजचा समावेश होता. त्यांनी ऑपरेशनच्या सुरुवातीला इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना निकामी केले. तसेच IDF कमांडोजच्या नव्या कारवायांचा खुलासा केला. इस्रायल संरक्षण दलाने याबाबत स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.

वाचा: इराणला मोसादने आतून पोखरलं! काल तिघांना फाशी, आज…

मोसाद काय आहे?

मोसाद ही इस्रायलची गुप्तचर यंत्रणा जगभरातील गुप्त ऑपरेशन्ससाठी प्रसिद्ध आहे. अशा कारवायांमध्ये मोसादने यापूर्वीही इराणमधील अणुशास्त्र वैज्ञानिकांची हत्या आणि गुप्त माहिती गोळा करण्यात यश मिळवले. या युद्धात मोसादच्या कमांडोजनी इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेची अचूक माहिती गोळा करून ड्रोन आणि इतर उपकरणे तैनात केल्याचेही सांगितले जाते. या ऑपरेशनमुळे इराणच्या लष्करी क्षमतांना मोठा धक्का बसला असून, इस्रायलने आपली सामरिक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अशा गुप्त कारवायांमुळे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.