पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा मृत्यू, भारताचा सर्वात मोठा शत्रू ठार
मंगळवारी जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी जैशचे अनेक मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अब्दुल अजीज एसारचा मृत्यू झाला आहे. अब्दुल अजीजचा मृतदेह पंजाबमधील बहावलपूर परिसरात आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी जैशचे अनेक मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे अब्दुल अजीजच्या सहकाऱ्यांना त्याचा मृतदेह गूढ परिस्थितीत सापडला. सुरुवातीला अब्दुल अजीजचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात होते, मात्र जैश-ए-मोहम्मदच्या एन्क्रिप्टेड सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये ही शक्यता फेटाळण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट नाही. यामुळे त्याच्या मृत्यूबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. सुरक्षा विश्लेषकांमध्ये आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. हा अंतर्गत वादामुळे झालेला खून आहे की यामागे बाहेरील शक्तींचा हात आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जैशला मोठा धक्का
अब्दुल अजीज गेल्या महिन्यात झालेल्या एका भारतविरोधी रॅलीत सहभागी झाला होता, जिथे त्याने भारताचे सोव्हिएत युनियनप्रमाणे (USSR) तुकडे करण्याची धमकी दिली होती. सूत्रांनुसार, अब्दुल अजीज हा भारताविरुद्ध लोकांना भडकावण्यात आणि जैशसाठी दहशतवाद्यांची भरती करण्यात सक्रिय होता. तो जैशच्या तरुण भरती विभागाचा एक महत्त्वाचा सदस्य मानला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे जैशला मोठा धक्का बसला आहे.
Jaish e Mohammed Commander, Maulana Abdul Aziz, Found Dead Under ‘Mysterious Circumstances’ pic.twitter.com/VGrf2p9T7b
— Ravindra Joshi (@ravindra11joshi) June 3, 2025
9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आधीच अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या ऑपरेशनमध्ये तब्बल १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, जवळपास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. यानंतरही पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांचे सातत्याने मृत्यू होत आहेत. गेल्या काही महिन्यांत जैश आणि लष्कर-ए-तैयबा या दोन्ही संघटनांच्या अनेक प्रमुख दहशतवाद्यांचा अशाच गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या मृत्यूंची थेट जबाबदारी स्वीकारली नसली तरी, हे मृत्यू भारताच्या वाढत्या गुप्तचर क्षमतेकडे आणि दहशतवादविरोधी धोरणाकडे निर्देश करतात, असे मानले जात आहे.
