3 तरुण मुलींसोबत महान वैज्ञानिक…एपस्टीन फाईल्समधील धक्कादायक फोटोमुळे खळबळ; त्या महालात काय चालायचं?
बाललैंगिक गुन्ह्यात दोषी ठरलेला जेफ्री एपस्टीन याच्या फाईल्समधील अनेक फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये एका नोबेल विजेता शास्त्रज्ञाचा फोटोदेखील आहे.

Jeffrey Epstein Files : अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्स सार्वजनिक केल्यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या फाईल्समध्ये जगातील अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध लोकांची नावे आलेली आहेत. जेफ्री एपस्टीन हा बाल लैंगिक गुन्ह्यांतील गुन्हेगार आहे. तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. समोर आलेल्या एपस्टीन फाईल्समध्ये तो लहान मुलींना कशा पद्धतीने फसवायचा, त्यांचे शोषण कसे करायचा? याबाबतची धक्कादायक माहिती समोर आलेला आहे. यासह या एपस्टीन फाईल्समध्ये आतापर्यंत अब्जाधीश बिल गेट्स, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सन अशा दिग्गजांची नावे आलेली आहेत. असे असतानाच आता याच एपस्टीन फाईल्समधून जगाला हदरवून टाकणारी धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याने जगप्रसिद्ध अशा नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये या शास्त्रज्ञाच्या बाजूला तीन तरुण मुली दिसत असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमके प्रकरण काय? तो शास्त्रज्ञ नेमका कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार या वैज्ञानिकाचे नाव जेम्स वॉटसन असे आहे. ते एपस्टीन याच्या न्यूयॉर्क येथील महालात उपस्थित असल्याचे एका फोटोमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आजूबाजूला एकूण तीन तरुणी दिसत असून फोटोमध्ये वॉटसन स्मीतहास्य करत असल्याचे दिसत आहे. हाच फोटो पाहून सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. जेम्स वॉटसन हे काही सर्वसामान्य शास्त्रज्ञ नाहीत. जीवशास्त्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी डीएनच्या डबल हेलिक्स संरचनेचा शोध लावलेला आहे. त्यांनी लावलेला हा शोध जगातील ऐतिहासिक असा आहे. त्यांच्या शोधनानंतर जीवशास्त्रात मोठी क्रांती घडून आली.
जेम्स वॉटसन यांच्याविषयी एपस्टीन फाईल्समध्ये नेमकं काय आहे?
जेम्स वॉटसन यांनी 1953 साली हा डीएनए संदर्भातला शोध लावला होता. त्यानंतर 1962 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेम्स वॉटसन यांचा 2025 साली वयाच्या 97 व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आता एपस्टीन फाईल्समध्ये त्यांचे नाव आणि फोटो असल्याचे समोर आले आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे भविष्यात आणखी कोणकोणती माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.