नवा उत्तराधिकारी ठरला! किम जो उननंतर उत्तर कोरियामध्ये ही व्यक्ती करणार राज्य?
north korea: गेल्या काही वर्षांपासून किम जो उन हे काही समस्यांना समोरे जात आहेत. ते 41 वर्षांचे असले तरीही त्यांचे वजन 140 किलोग्राम आहे. तसेच त्यांच्या वडिलांनी अचानक उत्तराधिकारी घोषित करण्याची जी चूक केली ती त्यांना करायची नसल्यामुळे ते या सर्व तयारीला लागल्याचे म्हटले जात आहे.

उत्तर कोरिया, आधुनिक जगातील सर्वात गुप्त आणि एकाकी देशांपैकी एक आहे. येथे किम जोंग उन हे सध्या सर्वोच्च नेते म्हणून सत्ता सांभाळत आहेत. प्यॉन्गयांग हे त्याची राजधानी आहे. उत्तर कोरिया हा देश कठोर राजकीय धोरणं, लष्करी शक्ती आणि अण्वस्त्र कार्यक्रमांमुळे जागतिक स्तरावर कायम चर्चेत राहिलेला देश आहे. किम जोंग उन, ज्यांनी 2011 मध्ये आपले वडील किम जोंग इल यांच्यानंतर सत्ता हाती घेतली. आपल्या कडक नियंत्रण आणि देशाच्या बंदिस्त धोरणांसाठी ते ओळखले जातात. उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे. तर आंतरराष्ट्रीय समुदायाशी त्याचे संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. विशेषतः त्याच्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे. आता उत्तर कोरियामध्ये नवा उत्तराधिकारी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही व्यक्ती कोण आहे? चला जाणून घेऊया…
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आपल्या 12 वर्षीय मुलीला उत्तराधिकारी बनवण्याच्या तयारीत आहेत. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, किम आपल्या मुलीला तेच राजकीय आणि लष्करी धडे शिकवत आहेत, जे त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवले होते. या तरुण उत्तराधिकाऱ्याला सत्तेची सूत्रे हाती घेण्यासाठी तयार करण्यामागे किम यांच्या प्रकृतीशी संबंधित कारणे आणि भविष्यातील रणनीती आहे.
उत्तर कोरियाची सत्ता हस्तांतरणाची तयारी
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आता आपल्या सत्तेचा वारसा पुढे नेण्याच्या तयारीत आहेत. अशी चर्चा जोरात आहे की, त्यांच्यानंतर त्यांची 12 वर्षांची मुलगी किम जू-ए उत्तर कोरियाची पुढील शासक होऊ शकते. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका सविस्तर अहवालात यामागील काही ठोस कारणे सांगण्यात आली आहेत.
नोव्हेंबर 2022 मध्ये किम जोंग उन यांनी प्रथमच आपल्या मुलीचा जगासमोर परिचय करून दिला. तेव्हापासून गेल्या तीन वर्षांत उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी किम जू-ए यांना त्यांच्या वडिलांसोबत अधिक प्रमुखतेने दाखवण्यास सुरुवात केली आहे. किम जू-ए यांना अशा व्यासपीठांवर पाहिले गेले आहे, ज्यामुळे असा संकेत मिळतो की किम जोंग उन आपल्या मुलीला देशाची सत्ता हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहेत.
तीन वर्षांत काय काय बदलले?
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे की, किम जू-ए यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत अद्याप निश्चित निष्कर्ष काढता येणार नाहीत. पण गेल्या तीन वर्षांत त्यांचे सार्वजनिक प्रोफाइल लक्षणीयरीत्या वाढले आहे. कालांतराने त्यांचा पेहराव अधिक औपचारिक झाला आहे. आज त्या फर कॉलर असलेले लेदर कोट आणि डिझायनर सूट परिधान करतात. त्यांनी त्यांची आई आणि किम यो-जोंग (किम जोंग उन यांची बहीण, ज्यांना एकेकाळी संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते) यांना मागे टाकले आहे आणि आता त्या शासक कुटुंबातील प्रमुख महिला चेहरा बनल्या आहेत.
किम जोंग उन मुलीला कसे प्रशिक्षण देत आहेत?
किम जोंग उन यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये ICBM प्रक्षेपणाच्या प्रसंगी आपल्या मुलीचा सार्वजनिक परिचय करून देण्यासाठी हा क्षण निवडला. त्यानंतर त्यांनी तिला अनेक अण्वस्त्र आणि लष्करी ठिकाणांवर नेऊन अधिकाऱ्यांशी भेटी घडवल्या. जेव्हा किम जोंग उन यांना त्यांच्या वडिलांनी उत्तराधिकारी म्हणून तयार केले होते, तेव्हा त्यांनी प्रथम लष्करात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. आता, किम जू-ए यांना लष्करी कार्यक्रमांमध्ये नेऊन, त्यांना तीच प्रक्रिया शिकवली जात आहे.
उच्च लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्याप्रती निष्ठा दाखवण्याची संधी दिली जात आहे. 2023 च्या अखेरीस एका जनरलला त्यांच्यासमोर गुडघे टेकताना पाहिले गेले, जे यापूर्वी फक्त किम जोंग उन यांच्यासाठी केले जायचे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, एवढ्या कमी वयात उत्तराधिकारी तयार करण्यामागील कारण म्हणजे किम आपल्या वडिलांची चूक पुन्हा करू इच्छित नाहीत, ज्यांनी आपल्या स्ट्रोकनंतरच उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली होती.
उत्तराधिकारीबाबत चर्चा का?
यामागील प्रमुख कारण म्हणजे किम यांची प्रकृती. जरी किम यांचे वय फक्त 41 वर्षे असले, तरी त्यांचे वजन 140 किलोग्राम आहे. त्यांना धूम्रपान आणि मद्यपानाची सवय आहे. असे मानले जाते की, त्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत, ज्यामुळे त्यांचे वडील आणि आजोबा यांचा मृत्यू झाला होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कमी वयात उत्तराधिकारी तयार करणे हे अमेरिका आणि दक्षिण कोरियाविरुद्ध मानसिक वर्चस्व मिळवण्यासाठीही आहे.
