काबूल : अफगाणिस्तान मागील अनेक दशकांपासून अशांत देश म्हणूनच ओळखला जातोय. या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्या कायमच्याच युद्धजन्य परिस्थितीमुळे होरपळून निघालं आहे. त्यामुळे मुलभूत गरजांचाही तुटवडा निर्माण झालाय. याची कारणं इतिहासात आहेत. जगातील प्रत्येक महासत्तेने अफगाणिस्तानवर नियंत्रणाचा प्रयत्न केला आणि या महासत्तांचा सपशेल पराभव झाला. याची सुरुवात अगदी जगजेत्या सिकंदर महानपासून झाली. एका वर्षात जगाचा मोठा भूभाग जिंकणाऱ्या सिकंदरला त्या तुलनेत लहान अफगाणिस्तान जिंकायला तब्बल 3 वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. मात्र, जिंकूनही त्यांना फार काळा अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवता आलंच नाही. हाच अनुभव अगदी ज्यांचा सूर्य कधीच मावळला नाही अशा ब्रिटिशांनाही आला.