ज्याची भीती होती तेच घडणार? नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय? नवीन अलर्ट जारी…
नेपाळमध्ये २६ ऑगस्टच्या विनाशकारी जलप्रलयानंतर पुन्हा नवीन अलर्ट जारी झाला आहे. दीड हजारहून अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या त्या घटनेतून नागरिक अजूनही सावरले नसताना, शुक्रवार ते रविवारदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः गांडकी आणि लुंबिनी प्रांतात जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी जलप्रलय झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. भोटेकोशी नदीला महापूर आल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे दीड हजाराहून अधिक लोक या प्रलयात जीवानिशी गेले. तर शेकडो लोक बेपत्ता झाले. घरदार, जमीन, पूल, इमारती सर्व काही वाहून गेलं. गावंच्या गावं पाण्याखाली गेली. या प्रलयातून नेपाळचे नागरिक अजूनही सावरलेले नाहीत. दु:खाच्या जखमा उरात ठेवून नेपाळी नागरिक दिवस ढकलत आहेत. कुठून तरी आपला मुलगा, मुलगी, वडील, बायको, आई येईल आणि घट्ट मिठी मारेल असं त्यांना अजूनही वाटतंय. या जखमा ताज्या असतानाच नेपाळी नागरिकांना अजून एक धडकी भरवणारा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नेपाळी नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
नेपाळच्या जल विज्ञान आणि हवामान विज्ञान विभागाने आज मोठा अलर्ट जारी केला आहे. शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान देशातील अनेक भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गांडकी आणि लुंबिनी प्रांतातील काही भागात तर प्रचंड पाऊस कोसळणार आहे. देशाचा राष्ट्रीय आपत्ती विभाग, हवामान खातं आणि एक खासगी एजन्सी मिळून नद्यांचा जलस्तर आणि आपत्तीचा धोका यावर लक्ष ठेवून आहेत.
26 ऑगस्ट रोजी हाहा:कार
26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेटच्या सीमेवर अचानक महापूर आला होता. उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक गाव आणि वस्त्यांमध्ये पुराचं पाणी भरलं होतं. हिमालयातून वाहत येणाऱ्या भोटेकोशी नदीचा जलस्तर भयंकर वाढल्याने हे सर्व पाणी नदीच्या खालच्या भागातून थेट गावांमध्ये शिरलं होतं. त्यामुळे घरं, रस्ते, जमीन, वाहने, पूल सर्व पाण्याखाली गेले होते. तसेच इमारतीही पाण्यामुळे ढासळल्या होत्या. विद्यूत खांब कोलमडून पडल्याने असंख्य गावे अंधारात गेले होते. या जलप्रलयाने नेपाळचं कंबरडच मोडलं होतं. विशेष म्हणजे, नेपाळमध्ये पावसाचा एक थेंबही पडला नव्हता, तरी नेपाळमध्ये मोठा जलप्रलय आला होता.
धोका किती मोठा?
या जलप्रलयात 1,450 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सुमारे 5,600 हून अधिक लोक बेपत्ता झाले होते. दरम्यान, या तीन दिवसासाठी परत अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, 26 ऑगस्ट सारखीच आपत्ती येणार की नाही? याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हवामान खात्यातील अधिकाऱ्यांच्या मते, भूस्खलन, पूर, ढिगारा वाहून येणं आणि रस्त्यांचं नुकसान आदी गोष्टी या पावसात होऊ शकतात. अधिकाऱ्यांनी सूचक इशारा दिल्याने नेपाळमधील नागरिक धस्तावलेले आहेत. तीन दिवसात काय होईल आणि काय नाही? याची चिंता नागरिकांना लागून राहिली आहे.
18 दिवस पृथ्वी राजमार्ग बंद
दरम्यान, पृथ्वी राजमार्ग ऑगस्टच्या पुरानंतर 18 दिवस बंद होता. नुकताच हा राजमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुरामुळे कृष्णभीर जवळ या राजमार्गाच्या काही भागाला नुकसान झालं होतं. या राजमार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी 17 सप्टेंबर रोजी या ठिकाणी नवीन ट्रॅक सुरू करण्यात आला आहे.
