
येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय न्रस निमिषा प्रिया हिला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर निमिषा हिला 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. तथापि, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंठापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपानंतर फाशी पुढे ढकलण्यात आली. मात्र मंगळवारी, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला की, येमेनमध्ये निमिषाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. तथापि, भारत सरकारने अद्याप या विषयावर काहीही सांगितलेले नाही.
निमिषाची शिक्षा रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत अजूनही गोंधळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येमेनी अधिकाऱ्यांनी निमिषाची शिक्षा रद्द केलेली नाही, केले जाणारे सर्व दावे खोटे आहेत. भारत आणि येमेन सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. अशा परिस्थितीत निमिषा प्रिया प्रकरणात पुढे काय होईल हे स्पष्ट नाही.
शिक्षा रद्द केल्याचा दावा कोणी केला?
भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंठापुरम एपी अबुबकर मुसलियार यांनी फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांनी येमेनी धार्मिक नेत्यांशी चर्चा केली, त्यानंतर फाशीची शिक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली. येमेनने निमिषाची फाशीची शिक्षा रद्द केल्याचा दावा ग्रँड मुफ्तींच्या कार्यालयाने केला. यासंदर्भात सना येथे एक उच्चस्तरीय बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सरकारतर्फे कोणतेही विधान नाही
भारत सरकारही बऱ्याच काळापासून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, शिक्षा रद्द करण्याच्या दाव्यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की आतापर्यंत निमिषाची फाशीची शिक्षा रद्द झालेली नाही. आता या प्रकरणावर पसरणाऱ्या अफवांवर सरकार कधी निवेदन जारी करते हे पाहणे बाकी आहे.
निमिषाच्या लेकीचं भावूक अपील
निमिषा प्रियाच्या मुलीने तिच्या आईसाठी भावनिक आवाहन केले होते. भारतीय ख्रिश्चन धर्मोपदेशक के.ए. पॉल यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये निमिषाची मुलगी तिच्या आईला क्षमा करण्याचे आवाहन करत आहे. तिच्या आईला उद्देशून ती म्हणाली, “आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते.” हा व्हिडीओ पीटीआय या न्यूज एजन्सीने शेअर केला होता.
काय होतं प्रकरण ?
निमिषा प्रियाला येमेनमध्ये तिचा यमनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदी याची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. यानंतर तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. निमिषावर आरोप आहे की तिने 2017 साली तलालला भूल देण्याचे इंजेक्शन दिले,कारण तलालने तिचा पासपोर्ट जप्त केला होता. मात्र औषधाच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र आपला तलालला मारण्याचा कोणताही हेतू नव्हता, परंतु इंजेक्शनच्या अतिसेवनामुळे तलालचा मृत्यू झाला असा दावा निमिषाने केला. .
ब्लड मनीच्या पर्यायावर विचार
निमिषा प्रियाला फाशी होणार होती, परंतु या वर्षी 16 जुलै रोजी तिची शिक्षा पुढे ढकलण्यात आली. निमिषाला माफ करण्यासाठी ‘ब्लड मनी’चा पर्याय विचारात घेतला जात होता. शरिया कायद्यानुसार, ‘ब्लड मनी’ ही एक तरतूद आहे ज्याद्वारे गुन्हेगाराला माफ केले जाते, परंतु त्यासाठी त्याला पीडितेच्या कुटुंबाला भरपाई द्यावी लागते.