
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानने भारताकडून हल्ला होण्याची प्रचंड धास्ती घेतली आहे. यामुळे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये प्रशासनाकडून अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. पाकिस्तानने पीओकेमध्ये आणीबाणी घोषित करत सर्वांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवले आहे. सरकारी वाहनांचा खासगी वापर करण्यास बंदी आणली आहे.
२५ एप्रिल रोजी झेलम व्हॅली आरोग्य संचालनालयाने आदेश काढले आहे. त्या आदेशात “आणीबाणीची परिस्थिती” असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे सर्व रुग्णालये आणि आरोग्य युनिटमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित ड्युटी पॉइंट्सवर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही कर्मचारी सुट्टी घेणार नाही किंवा बदली होणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
भारतीय सुरक्षा संस्थांनी पाकिस्तानकडून पीओकेमध्ये काढण्यात आलेल्या आणीबाणीचा आदेश गंभीरतेने घेतला आहे. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) असामान्य लष्करी किंवा दहशतवादी कारवाया वाढू शकतात, अशी शक्यता आहे.
देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन सर्व आरोग्य केंद्रांच्या प्रभारींना सूचना दिल्या आहेत. जिल्हा मुख्यालय रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय केंद्रांमध्ये कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे सांगितले आहे. डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांना सदैव तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आरोग्य केंद्रांमधील सर्व वैद्यकीय अधिकारी अन् पॅरामेडिकल कर्मचारी जे रजेवर गेले आहेत त्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत, असे पीओके प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानने भारताकडून व्यापार थांबवल्यानंतर औषधींचा साठ करण्यास सुरुवात केली आहे. आप्तकालीन परिस्थिती समजून औषधांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे, जिओ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे. पाकिस्तानच्या ड्रग रेग्यूलेटरी अथॉरिटीकडून याला दुजोरा मिळाला आहे.