
आर्थिक परिस्थिती अनेकदा इतकी खालावते की लोकांना अन्न मागून खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो. पण, पाकिस्तानात याच गरिबीचा फायदा घेऊन परदेशात जाळे पसरवले जात आहे. लोक गरिबीला व्यवसाय बनवत आहे. या शेजाऱ्यांनी यातून कोट्यवधी कमावले आहेत. आपण पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीत आहे, असं म्हणत असलो तरी प्रत्यक्षात नेमकी काय परिस्थिती वेगळी असू शकते.
पाकिस्तानात भीक मागणे हा सर्वात महत्वाचा व्यवसाय बनला आहे. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 23 कोटी असून त्यापैकी सुमारे 4 कोटी लोक भीक मागत आहेत. म्हणजेच पाकिस्तानातील प्रत्येक सहावा माणूस भीक मागतो. पाकिस्तानी केवळ आपल्याच देशात भीक मागत नाहीत तर परदेशातही हा ‘प्रोफेशन’ स्वीकारत आहेत. भिकाऱ्यांमुळे पाकिस्तान सरकारला आपली जागतिक प्रतिमा हाताळणे अवघड जात आहे.
डॉनच्या अहवालानुसार, पाकिस्तानची लोकसंख्या 23 कोटी असून त्यापैकी 38 दशलक्ष व्यावसायिक भिकारी आहेत. एका भिकाऱ्याचे राष्ट्रीय सरासरी उत्पन्न दिवसाला 850 पाकिस्तानी रुपये आहे. या भिकाऱ्यांना दररोज 32 अब्ज रुपये म्हणजेच वार्षिक 117 लाख कोटी रुपयांची भीक मिळते. अमेरिकन डॉलरमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 42 अब्ज डॉलर आहे.
डॉनच्या रिपोर्टनुसार, 38 दशलक्ष लोकांना वर्षाला 42 अब्ज डॉलर्स विनामोबदला मिळत आहेत. त्याचा मोठा बोजा थेट देशाच्या उर्वरित लोकसंख्येवर पडत असून त्यामुळे महागाई वाढत आहे. पाकिस्तानमधील बिझनेस अँड सोसायटी सेंटरच्या अहवालानुसार, देशात भीक मागण्याची प्रथा वाढत आहे कारण ती इतर अकुशल कामगारांच्या तुलनेत जास्त कमावत आहे.
आशियाई मानवाधिकार आयोगाच्या (AHRC) म्हणण्यानुसार, पाकिस्तानची अडीच ते अकरा टक्के लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी भीक मागत आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, देशातील प्रमुख शहरी केंद्रांच्या रस्त्यांवर सुमारे 1.2 दशलक्ष मुले फिरतात.
पाकिस्तान सरकारने रस्त्यावर भीक मागण्यासाठी परदेशात जाणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा केली आहे. परदेशात पकडले जाणारे 90 टक्के भिकारी हे पाकिस्तानी वंशाचे असल्याने ही माहिती गोळा केली जात आहे. इराक आणि सौदीच्या राजदूतांनी पाकिस्तान सरकारकडे तक्रार केली आहे.
धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली सौदी अरेबिया, इराक आणि इराण सारख्या देशांमध्ये भीक मागण्यासाठी जाणाऱ्यांचे हजारो पासपोर्ट पाकिस्तान सरकारने निलंबित केले आहेत. गेल्या अडीच वर्षांत सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांतून 44 हजारांहून अधिक भिकाऱ्यांना पाकिस्तानात परत पाठवण्यात आले आहे.