काश्मीरी भावांची कुर्बानी….असीम मुनीर पुन्हा बरळला, दहशतवाद्यांचा उमाळा, भारताला गर्भित धमकी काय?
Pakistan Army Chief Asim Munir : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या काळजात खोल जखमी केल्याचे वारंवार दिसून येत आहे. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला तर चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहे. आता तो पुन्हा बरळला आहे. त्याला दहशतवाद्यांचा उमाळा आला आहे.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला. त्याच्या काळजात कधी न भरून येणारी खोल जखम झाली. भारताच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला. पहलगाम हल्ल्याच्या चोख आणि अचूक उत्तराने पाकिस्तान जगभरात उघड पडला. पाकचा लष्करप्रमुख असीम मुनीर याला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. आता त्याने पुन्हा काश्मीरी राग आळवला आहे. ढगात पोहचलेल्या दहशतवाद्यांच्या आठवणीत त्याचा कंठ दाटला. पाकिस्तानी नौदलाच्या परेडमध्ये त्याने काश्मीर मुद्दावर छाती बडवली. जर भारताने या क्षेत्रात तणाव वाढला तर शत्रू राष्ट्र त्याला जबाबदार असेल आणि त्याचा वाईट परिणाम होईल अशी धमकी त्याने दिली.
दहशतवाद्यांसाठी बडवला ऊर
पाकिस्तान दहशतवाद्यांच्या हल्ल्याला त्याने काश्मीरमधील भावांसाठीची लढाई म्हटले. आपल्याला भारताविरोधात लढणाऱ्या काश्मीरी भावांची कुर्बानी लक्षात ठेवावी लागेल, असे तो बरळला. दहशतवाद्यांना त्याने काश्मीरी नागरिक म्हटले आहे. पाकिस्तानचा दुटप्पीपणा समोर आला आहे. काश्मीर अशांत ठेवण्याचे पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचेच हे संकेत आहे. सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानचे डोळे उघडलेले नाहीत. भारताविरोधात आगळीक केल्यास त्याला जशाच तसे उत्तर देण्याचे मोदी सरकारने पाकिस्तानला ठणकावले आहे. त्यामुळे छुप्या लढाईच्या माध्यमातून पाकिस्तान भारताचे विकासावरील लक्ष विचलीत करण्याचे आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचा पुरस्कार करत आहे.
असीम मुनीर याने पाकिस्तानमधील ताज्या दहशतवादी हल्ल्यांसाठी भारताला दोषी ठरवले आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद समूळ नष्ट करण्याचे त्याने जाहीर केले आहे. तर त्याचवेळी भारतामुळे पाकमध्ये दहशतवाद वाढत असल्याचा कांगावा केला आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. दोन्ही देश समारोसमोर आले. पण पाकिस्तानने या परिस्थितीत संयम दाखवला, अशी त्याने पाठ थोपटून घेतली.
भारताने पाकिस्तानविरोधात आगळीक केल्याचा दावा त्याने केला. भारताच्या हल्ल्याला पाक लष्कराने तेवढ्याच धैर्याने उत्तर दिल्याचा पोकळ दावा त्याने केला. पाकिस्तानला या क्षेत्रात शांतता हवी असल्याची थाप सुद्धा त्याने सैनिकांसमोर मारली. जर या क्षेत्रात तणाव वाढला तर शत्रू राष्ट्र त्याला जबाबदार असेल. त्याचे परिणाम ही त्याला भोगावे लागतील असा गर्भित इशारा त्याने दिला. भारताने गुडघ्यावर आणल्याचे लपवत मुनीर स्वतःची पाठ थोपटून घेताना दिसला.
