
Asim Munir To Visit America : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील सर्वांधिक ताकतवान असलेल्या तेथील लष्कर प्रमुख असीम मुनीर याला अमेरिकेने निमंत्रित केलं आहे. येत्या 14 जून रोजी अमेरिकेत यूएस आर्मी डेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेने फील्ड मार्शल असीम मुनीर याला आमंत्रित केले आहे.
लवकरच जनरल असीम मुनीर अमेरिकेच्या यूएस आर्मी डेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासानुसार येत्या 12 जून रोजी असीम मुनीर हा अमेरिकेत जाईल. या काळात असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्या बैठकीत चीन, दहशतवाद तसेच भारतासोबत पाकिस्तानचा असलेला वाद यावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद संपावा यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानवर दबाव टाकला जात आहे. असे असताना आता जनरल असीम मुनीर याच्या अमेरिका दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान अमेरिकेसोबत संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेने पाकिस्तानमधील खनीज क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे पाकिस्तानला वाटते. पाकिस्तानचा हा मनसुबा सत्यात उतरला तर अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या आयात शुल्कापासून आपल्याला सूट मिळेल, असे पाकिस्तानला वाटते. दुसरी बाब म्हणजे बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे यासाठी बलुच लिबरेशन फ्रंटकडून मोठी चळवळ राबवली जात आहे. या संकटकापासून सुटका मिळावी आणि त्यासाठी अमेरिकेने मदत करावी, असे पाकिस्तानला वाटत आहे. मुनीर याच्या या अमेरिका दौऱ्यामुळे या दोन्ही मनसुब्यांबाबत काहीतरी सकारात्मक घडेल, अशी पाकिस्तानला आशा आहे.
दरम्यान, आता असीम मुनीर हा यूएस आर्मी डेच्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून जाणार असल्यामुळे त्याच्या या दौऱ्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारतीय राजनयीकांचेही याकडे विशेष लक्ष असेल.