
भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती असताना पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला पदावरून काढून टाकल्याचं समजतंय. त्याच्या जागी जनरल शमशाद मिर्झाची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं आहे. परंतु याप्रकरणी पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. पाकिस्तानमधील नागरी आणि लष्करी दल यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वाद आणि अस्थिरतेमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. असीम मुनीरचा कार्यकाळ प्रचंड वादात अडकला होता. तर नवीन लष्करप्रमुख जनरल शमशाद मिर्झा हे अत्यंत अनुभवी आणि संतुलित लष्करी अधिकारी मानले जात आहेत. पाकिस्तानच्या लष्करी धोरणांमध्ये सुधारणा आणि स्थिरता आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
भारताने केलेल्या लष्करी कारवाईदरम्यान पाकिस्तानी हवाई दल आणि लष्कर यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाला योग्य माहिती वेळेत देण्यात आली नाही. जर सैन्य सतर्क असतं तर भारताकडून झालेली कारवाई टाळता आली असती, असं पाकिस्तान सरकारचं मत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जनरल मुनीर यांना याबाबत थेट सवाल केल्याचं वृत्त आहे.
पाकिस्तानमधील लोक सोशल मीडियाद्वारे लष्कराकडून उत्तरं मागत आहेत. ‘तुमची तयारी कुठे आहे’, असे प्रश्न पाकिस्तानच्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. जनरल मुनीरच्या मौनामुळे जनतेमध्ये लष्कराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुच बंडखोरांनी पाकिस्तानी सुरक्षा चौक्यांवर भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून अनेक पाकिस्तानी सैनिकसुद्धा जखमी झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर जनरल मुनीरच्या रणनीतीवर पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. भारताने कराची बंदरावर केलेला हवाई हल्ला आणि समुद्री हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यात नेतृत्व बदलाची मागणी जोर धरत आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया अंतर्गत पातळीवर सुरू असल्याने त्याची अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही. यासोबतच जनरल असीम मुनीरच्या राजीनाम्याची मागणी करणारं #MunirOut सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. इतकंच नव्हे तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे असीम मुनीरचा हात असल्याचा आरोप माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी केला आहे. त्यामुळे मुनीरविरोधातील असंतोष आणखी वाढल आहे.