
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा सीमेवर जोरदार संघर्ष झाला. यानंतर आता अफगाणी सैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.अफगाणिस्तानाकडून पाकिस्तानला थेट धमकी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक परिसरातून तालिबानच्या कमांडरने थेट पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांना इशारा दिला आहे. तुम्ही युद्ध सुरू केलं आहे, त्याचा परिणाम भयंकर होईल आम्ही पाकिस्तानचे तुकडे करू असा इशारा तालिबानकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक परिसरात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जोरदार गोळीबारीची घटना घडली आहे, यामध्ये अफगाणिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान आता या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या एका कमांडरने या परिसरात येऊन थेट पाकिस्तानला धमकी दिली आहे. जर तुम्ही अशा घटना थांबवल्या नाहीत तर आम्ही पाकिस्तानचे तुकडे-तुकडे करू असं या कमांडरने म्हटलं आहे. जर आम्ही हे काम करू शकलो नाही तर आमचे मुलं तर नक्की हे काम करतीलच, पाकिस्तानचे तुकडे -तुकडे होतील असं या कमांडरने म्हटलं आहे.
अफगाणिस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानमधील तालीबानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये आमच्या चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. अफगानिस्तानच्या दक्षिण कंधार प्रांतामधील स्पिन बोल्डक बॉर्डर क्रॉसिंग परिसरात पाकिस्तानी सैनिकांकडून हा गोळीबार करण्यात आला आहे, दरम्यान त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने देखील गोळीबार केला. यामध्ये अफगाणिस्तानमधील चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर पाकिस्तानमधील देखील काही नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तान सैनिकांकडून काहीही कारण नसताना गोळीबार चालू करण्यात आला असा आरोप अफगाणिस्तानने केला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याला अफगाणिस्तानकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्यानंतर काल झालेल्या चकमकीनंतर आता अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानला धमकीच दिली आहे.