पाकिस्तानच्या आसीम मुनीरच्या पायाखालची जमीन सरकली, सर्वात मोठा शत्रू बाहेर येणार?

पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख आसीम मुनीर याला सध्या देशातील सर्वांत शक्तीशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते. आता याच असीम मुनीरला मोठा झटका बसला आहे. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तेथील सर्वोच्च न्यायालयाने एकूण 8 वेगवेगळ्या प्रकरणांत जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचा हा निर्णय आसीम मुनीरसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तानच्या आसीम मुनीरच्या पायाखालची जमीन सरकली, सर्वात मोठा शत्रू बाहेर येणार?
| Updated on: Aug 21, 2025 | 6:04 PM

Imran Khan And Asim Munir : पाकिस्तानमध्ये कधी काय होईल, हे सांगता येत नाही. इथे मतदान प्रक्रियेतून निवडून आलेले सरकार असले तरी या देशात लष्करालाही फार महत्त्व आहे. पाकिस्तानमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांत लष्कराची भूमिका असते. पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख आसीम मुनीर याला सध्या देशातील सर्वांत शक्तीशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते. आता याच असीम मुनीरला मोठा झटका बसला आहे. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तेथील सर्वोच्च न्यायालयाने एकूण 8 वेगवेगळ्या प्रकरणांत जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचा हा निर्णय आसीम मुनीरसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने तेथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एकूण 8 प्रकरणांत जामीन दिला आहे. 21 ऑगस्ट रोजी न्यायालयाने आपला हा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय देताना न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. आता इम्रान खान यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळायला हवा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोणत्या प्रकरणात मिळाला जामीन?

पाकिस्तानमध्ये 9 मे 2023 रोजी इम्रान खान यांच्या समर्थकांनी अनेक भागात पाकिस्तान लष्कराविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात सैन्याच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या आंदोलनाच्या रुपात पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच लष्कराचा थेट विरोध करण्यात आला. याच प्रकरणात पुढे इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

इम्रान खान तुरुंगाच्या बाहेर येणार का?

इम्रान खान यांना 9 मे च्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र अजूनही त्यांच्यावर अन्य काही आरोप आहेत. या आरोपांचे खटले अजूनही चालू आहेत. तोशखाना प्रकरणात तर इम्रान खान यांना कनिष्ठ न्यायालयाने शिक्षाही ठोठावलेली आहे. या निर्णयाविरोधात इम्रान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या न्यायालयाने एकूण 8 प्रकरणात इम्रान खान यांना जामीन दिला आहे. त्यामुळे लवकरच अन्य प्रकरणांतही खान यांना जामीन मिळेल आणि ते तुरुंगाबाहेर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानात उलथापालथ होणार?

दरम्यान, सध्या पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाने अन्य तीन पक्षांनी एकत्र आणून आघाडी तयार केली आहे. इम्रान खान यांनी पश्तून पार्टीचे महमूद खान अचकचई यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने फजल उर रहमान यांच्या जमात या पार्टीलाही विश्वासात घेतलं आहे. या घडामोडी घडत असताना आता इम्रान खान यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच पाकिस्तानत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.