
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येची बातमीही समोर आली होती. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, कसे आहेत, जिवंत आहेत की नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये बंद असलेल्या इमरान खान यांच्या बद्दल दीड महिन्यांपासून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कुटुंबीयांची आणि त्यांची भेट होत नाहीये. मात्र आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
इमरान खान यांच्या भेटीवरून पाकिस्तानात गोधळ सुरु आहे. यात आता पाकिस्तान सरकारने माघार घेतली आहे. आज पंजाब सरकारने इमरान खान यांना त्यांच्या बहिणीला भेटण्याची परवानगी दिली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी याबाबत घोषणा केली आहे. मरियम या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भाची आहेत. त्यामुळे आता इमरान खान यांची बहीण त्यांची भेट घेऊ शकणार आहेत.
इमरान खान यांची बहीण उज्मा खान या आता इमरान खान यांना भेटणार आहेत, त्यांना जेल प्रशासनाकडून याबाबत परवानगी मिळाली आहे. आज इमरान खान यांना भेटण्यासाठी जेलबाहेर समर्थकांची गर्दी पहायला मिळत आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि इमरान खान यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पहायला मिळाला. यावेळी इमरान यांना सोडा, इमरान खान झुकणार नाही अशी घोषणाबाजीही करण्यात आली.
इमरान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या कार्यकर्तांनी संपूर्ण पाकिस्तानात लढा सुरू केला आहे. सरकार मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत आहे. याआधी सरकारने दर आठवड्याला लोकांना इमरान खान यंना भेटण्याची परवानगी दिली होती, परंतु आता त्यांना न्यायालयाच्या परवानगीनंतरही प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये 2 आठवड्यांसाठी जमावबंदी करण्यात आली आहे.
इमरान खान यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बहिणींनी गेल्या आठवड्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आलिमा यांनी तुरुंग प्रशासन न्यायालयाचा अवमान करत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता तुरुंग प्रशासनाकडून त्यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इमरान खान यांच्याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर येण्याची शक्यता आहे.