
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) अधिवेशनाच्या निमित्ताने असीम मुनीर पुन्हा एकदा ट्रम्प यांना भेटणार आहेत. यावेळी त्यांच्यासमोर पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील असणार आहे. याआधी पाकिस्तानने ट्रम्प यांना भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर पाकिस्तानचे दोन नेते अमेरिकेला जाणार असल्याने पाकिस्तानामध्ये नेमकं काय घडत आहे? आगामी काळात मोठा निर्णय तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपद नाममात्र आहे, कारण या देशात लष्करप्रमुखांकडे सर्वात जास्त ताकद आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ हे फक्त आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये हजेरी लावतात आणि लष्कराने दिलेला संदेश वाचून दाखवतात. सर्व निर्णय रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयात घेतले जातात. गेल्या महिन्यात मुनीर आणि शरीफ हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेत सहभागी झाले होते, त्यावेळी शरीफ काय बोलणार हे पाकिस्तानी लष्कराने ठरवलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांना श्रेय घेण्याची सवय आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले होते. दोन्ही देशांमध्ये तीन दिवस संघर्ष झाला, त्यावेळी ट्रम्प यांनी अचानक समोर येऊन मी हे युद्ध रोखल्याचा दावा केला होता. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील डीजीएमओ अधिकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली होती, देश वाचवण्यासाठी ट्रम्पची प्रशंसा करणे योग्य राहील असं पाकिस्तानला वाटले होते.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे पाकिस्तान सतत आयएमएफचे दार ठोठावत असतो. पाकिस्तान नेहमी दहशतवादाच्या कलंकातून बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत अमेरिका हा एकमेव देश आहे. जो पाकिस्तानला मदत करु शकतो. त्यामुळे आता पंतप्रधान आणि लष्करप्रमुख बॉसला खूश करण्यासाठी अमेरिकेला जात आहेत. मात्र ट्रम्प हे देखील चतूर आहेत, ते पाकिस्तानसोबत नक्कीच काहीतरी करार करतील. त्यामुळे पाकिस्तानात नक्कीच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. तीन दिवसांच्या संघर्षात पाकिस्तान गुढघ्यावर आला होता. मात्र आता पाकिस्तान ट्रम्प यांच्या मदतीने जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, ‘आम्हाला शांतता हवी आहे, मात्र भारत आक्रमक होत आहे.’ आता मुनीर आणि शरीफ यांची ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे, त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.