भारताचा शेजारी कारगिल 2 च्या तयारीत? युद्धाची भाषा करत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी

| Updated on: Mar 02, 2021 | 6:58 PM

भारताने पाकिस्तानशी एकिकडे शांततेसाठी चर्चा करतानाच युद्धाचीही तयारी ठेवलीय. आता पुन्हा एकदा अशीच काहीशी परिस्थिती तयार झाल्याची चर्चा आहे.

भारताचा शेजारी कारगिल 2 च्या तयारीत? युद्धाची भाषा करत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तान सोबतचे भारताचे संबंध कायमच तणावाचे राहिले आहेत. अनेकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेसाठीही प्रयत्न झाले. मात्र, अद्याप याला यश आलेलं नाही. दोन्ही देशांमधील तत्कालीन सरकारांनी काही प्रमाणात शांतता प्रक्रिया पुढे नेली आणि पुन्हा या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. कारगिल युद्धाच्या वेळी तर पाकिस्तानकडून भारताचा विश्वासघातही झाला. यावेळी बेसावध असतानाही भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. यातूनच धडा घेत भारताने पाकिस्तानशी एकिकडे शांततेसाठी चर्चा करतानाच युद्धाचीही तयारी ठेवलीय. आता पुन्हा एकदा अशीच काहीशी परिस्थिती तयार झाल्याची चर्चा आहे (Pakistan purchasing weapons amid talk with India like Kargil War).

सध्या पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानने चर्चेतून मार्ग काढत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चर्चेतून सीमेवरील परिस्थिती पुन्हा एकदा व्यवस्थित होईल अशी आशा आहे. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानच्या काही हालचालींनी भारत सावधही आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान एकिकडे चर्चा करत आहे, तर दुसरीकडे सैन्याची शस्त्रास्त्र वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुप्त माहितीनुसार, पाकिस्तानने सीमेवर असलेल्या सैन्याचे जुने रणगाडे, बंदुका यांची मार्चपर्यंत दुरुस्ती करण्याचे आदेश सैन्याला दिलेत.

या तयारी शिवाय पाकिस्तान बाहेरील देशांमधूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करत आहे. ही खरेदी फास्ट ट्रॅक प्रणालीने करत आहे. या अंतर्गत पाकिस्तान आपल्या T-80 Tanks (रणगाडे) साठी थर्मल इमेज तंत्रज्ञान खरेदी करत आहे. यामुळे पाकिस्तानला रात्रीच्या अंधारातही आपल्या मोहिमा राबवता येणार आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानच्या सैन्याचे तिन्ही दल प्रमुख आपल्या सैनिकांशी विविध कार्यक्रमांमध्ये बोलताना युद्धासाठी तयार राहण्याचं आवाहन करत आहे. त्यामुळेच भारतानेही चर्चा करताना युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्याचीही तयारी ठेवलीय.

सध्याच्या परिस्थितीवरुन अनेकजण कारगिलच्या परिस्थितीची आठवण करुन देत आहेत. तेव्हा देखील पाकिस्तानवर अशाच प्रकारचा आंतरराष्ट्रीय दबाव होता. पाकिस्तानचं सैन्य आणि गुप्तचर संस्था तेथील सरकारवर कायमच दबाव तयार करत असते. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याकडून कधी कोणता डाव खेळला जाईल याचा अंदाज बांधणं कठिण असते. कारगिलच्या वेळी देखील एकिकडे पाकिस्तान चर्चा करत होता, तर दुसरीकडे युद्धाची तयारी. त्यामुळेच भारतीय सैन्य देखील या परिस्थितीला तयार देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

हेही वाचा :

पाकिस्तानात 55 वर्षाच्या DSPचं 19 वर्षीय मुलीशी लग्न! प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा

एका प्रवाशासाठी भारतीय विमानाचं थेट पाकिस्तानात लँडिंग; पायलटने निर्णय घेतला, पण…

पाकिस्तान भारतापुढे हात पसरणार?, तब्बल 1.5 कोटी रोजगार धोक्यात आल्याने इम्रान खान मजबूर !

व्हिडीओ पाहा :

Pakistan purchasing weapons amid talk with India like Kargil War