
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी अतिशय खास आणि महत्वाचा मानला गेला, संपूर्ण जगाचं लक्ष पुतिन (vladimir putin) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे लागलं होतं. या दोघांच्या भेटीदरम्यान अनेक महत्वाचे निर्णय, करारही दोन्ही देशांत झाले. पुतिन हे भारतात आल्यामुळे शेजारील देश, पाकिस्तानचा मात्र चांगलाच जळफळाट झाला. या भेटीदरम्यान पुतिन भारताला काय ऑफर देतात आणि कोणते मोठे करार होतात, याबद्दलच पाकिस्तानमध्ये प्रचंड चर्चा झाली. एवढंच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले पुतिन त्यांच्या देशात कधीच का येत नाहीत याबद्दलही पाकिस्तानी लोकांच्या मनात चिंता होती.
याबद्दल पाकिस्तानी एक्सपर्ट कमर चीमा यांन त्यांच्या शोमध्ये काही सवाल उपस्थित केले. “व्लादिमीर पुतिन पाकिस्तानात का येत नाहीत? त्यांनी यायला हवे. पुतिन अनेकदा पाकिस्तानवरून जातात, पण ते तिथे कोणताच संबंध ठेवत नाहीत. आम्ही खालून त्यांच्यासाठी शिट्टी वाजवतो आहे, पण ते का येत नाहीत? तिकडे (भारतात) जाऊन ते मोदींसोबत हसत बोलत असतात” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्याचे बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं.
पुतिन का येतील ?
कमर चीमा यांनी विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमी यांनी थेट उत्तर दिलं. ” आपलं काय काम आहे, त्यांना (पुतिन) इकडे का बोलवायचं. ते जर पाकिस्तानात आले, तर आपण त्यांना काय सांगू असं तुम्हाला वाटतं. फायटर जेट द्या, रशिया निर्मिती करतो अशी एखादी गोष्ट, तेल द्या असं सांगू. उधार द्या किंवा हप्त्याने द्या अशी मागणी करू. ते भारतात जातात तेव्हा रोख रकमेत बोलणं होतं. ते जर इथे आले, तर आपण त्या सगळ्या गोष्टी घेऊ, जे भारत घेईल ते आपण फक्त दाखवण्यासाठी घेऊ, पण फरक एवढाच आहे की आपण ते कर्जावर घेऊ किंवा त्यांच्याकडे फुकटच मागू, कारण आम्ही चांगले आहोत ना, असं त्यांना सांगू. किंवा कदाचित आपण ते हप्त्यांवर घेऊ शकतो, पण ते आपल्याला हप्त्यांवर वस्तू देण्याच्या मनःस्थितीत नाही. म्हणून ते भारतात गेले, तिथे ते सांगतील की सामान द्या, कॅश घ्या आणि विषय संपला” असं काजमी यांनी ऐकवलं.
ज्या दिवशी पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारेल आणि कोणी आपल्याकडे येऊन आपल्याला काही दिल्यास, आपण रोख रक्कम देण्यात सक्षम होऊ, त्या दिवशी लोक आपल्याकडेही येऊ लागतील, असेही आरजू काझमी म्हणाले.आता जर कोणी इथे आलं तर आपण त्यांना पूर दाखवतो, कधी कोविडची कारणं देतो, म्हणतो की आमची परिस्थिती वाईट आहे, रडगाणी गातो, मग कोणी त्यांचे खिसे रिकामे करायला इथे (पाकिस्तानात) का याईल, असा सवलाही काझमी यांनी उपस्थित केला.
ते फक्त बरोबरीच्या लोकांची भेट घेतात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे फक्त त्यांच्या बरोबरीच्या लोकांना भेटतात. अमेरिकेने मनाई करूनही भारत आपल्याकडून तेल घे राहील, हे त्यांना माहीत आहे. आपलं काय पण, ते जेव्हा जातील त्यांच्या विमानाचं टायरही आपण काढून घेऊ, असा खोचक टोला त्यांनी पाकिस्तानच्या एकंदर परिस्थितीवरून लगावला.