
रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लावलेले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशियाचा माल खरेदी करण्यास कोणताही देश तयार नाही. अमेरिकेने रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादला आहे. त्यामुळे भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे. मात्र आता रशियाने भारताला बंपर ऑफर दिली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने आता सर्वात मोठ्या सवलतीत भारताला कच्चे तेल विकण्यास सहमती दर्शवली आहे. ही ऑफर भारताने स्वीकारल्यास डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने भारताला फेब्रुवारी महिन्यासाठी उरल क्रूडवर प्रति बॅरल अंदाजे 10 डॉलर्सची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत गेल्या वर्षीपेक्षा 3 ते 5 डॉलर्स प्रति बॅरल जास्त आहे. 2022 नंतर पहिल्यांदाच रशियाने भारताला इतके स्वस्त तेल देण्यास सहमती दर्शवली आहे. या सवलतींसह रशिया भारतीय रिफायनरीजना पुन्हा अधिक तेल खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहे, मात्र आता भारत अमेरिकेच्या सूचनांना डावलून रशियाकडून तेलाची खरेदी करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कच्च्या तेलावर मोठी सूट देण्याच्या निर्णयामागे मोठे कारण आहे. अमेरिकेने रशियन दिग्गज कंपन्या ल्युकोइल आणि रोझनेफ्टवर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादले आहेत, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाला व्यापार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अमेरिकेने भारतावर दबाव टाकून रशियन तेलाची खरेदी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या रशियन तेलाला खरेदीदार नाही, त्यामुळे भारताना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी रशियाने भारताला ही ऑफर दिली आहे.
रशियाकडून तेल खरेदीत सवलत मिळत असतानाही भारत सध्या दुसऱ्या देशाकडून तेल खरेदीच्या विचारात आहे. भारतातील सर्वात मोठी रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, रशियाऐवजी ब्राझीलकडून तेल खरेदी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑइलने ब्राझिलियन कंपनी पेट्रोब्रास आणि इतर देशांकडून 7 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले आहे.