तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे जावई ड्रोन बनवतात?, मुलगीही वादाच्या भोवऱ्यात
भारतात काम करणारी तुर्की कंपनी सेलेबी एव्हीएशनने दावा केला आहे की त्यांची मालकीन सुमेया नाही तर सेलेबी ओलु कुटुंबातील कॅन सेलेबी ओलु आणि कॅनन सेलेबी ओलु हे तिचे मालक आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्या कुटुंबात नक्की कोण कोण आहेत हे पाहूयात....

भारत आणि पाकिस्तानच्या युद्धजन्य वातावरणात तुर्कीने पाकिस्तानला सर्वप्रकारची मदत केल्याने या देशाविरोधात संताप व्यक्त होत आहे. तुर्कीने पुरवलेल्या ड्रोनने पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे धाडस दाखवल्याने भारतात तुर्कीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला जात आहे. अशात तुर्कीच्या संरक्षण साहित्य निर्माण करणारी कंपनी बायकरचे चेअरमन सेल्जुक बायरकटार हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांचे जावई असल्याचे उघडकीस आले आहे.
सेल्जुक हे फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट आहेत. तुर्कीचे २७ अब्जाधीश या यादीत आहेत. सेल्जुक यांचा नेटवर्थ १.२ अब्ज डॉलर आहे.ते २,४१० व्या स्थानी आहेत. बायरकटार संपत्तीत वाढ लष्करी ड्रोन निर्मितीमुळे झाला आहे. सेल्जुक यांच्याकडे बायकर कंपनीची ५२.५ टक्के हिस्सेदारी आहे. ही कंपनी त्यांचे वडीलांनी १९८४ साली स्थापन केली होती. सेल्जुक यांनी साल २०१६ मध्ये अर्दोआन यांची कन्या सुमेये हिच्याशी निकाह केला आहे.
सेलेबी एव्हीएशन कंपनीचा दावा काय ?
सेलेबी एव्हीएशन कंपनीने हा दावा खोडून काढला आहे. कंपनीने म्हटलेय की आमची कंपनी तुर्कीची नसून मूळ कंपनीचा ६५ टक्के हिस्सा कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, युएई आणि युरोपच्या गुंतवणूकदारांकडे आहे. उरलेला हिस्सा नेदरलँडची एक कंपनी आणि जर्सी नावाच्या ठिकाणच्या एका फंडकडे आहे. कंपनीने म्हटले आहे की आम्ही कोणत्याही देशाच्या सरकार वा राजकारण्यांशी संबंधित नाही आणि संपूर्णपणे पारदर्शकपणे इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य क्षेत्रात काम करीत आहोत. विशेष म्हणजे सेलेबी एव्हीएशन भारताच्या नऊ सर्वात मोठ्या विमानतळांवर सेवा देत आहे.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांची फॅमिली
रेसेप तय्यिप एर्दोगान यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५४ रोजी इस्तंबूल येथे झाला. त्याचे कुटुंब मूळचे तुर्कीच राईझ येथील आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अमीन गुलबरन आहे. त्यांचा निकाह १९७८ मध्ये गुलबरन यांच्याशी झाला. त्यांना चार मुले आहेत. दोन मुलगे (अहमत बुराक आणि नेक्मेटिन बिलाल) आणि दोन मुली (एसरा आणि सुमेया). सुमेया एर्दोगान सध्या वादात सापडल्या आहेत. सुमेया सेलेबी एव्हिएशन इंडिया नावाच्या कंपनीशी संबंधित असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, कंपनीने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
संपूर्ण प्रकरण काय ?
भारत आणि पाकिस्तान तणावानंतर तुर्की आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. त्यामुळे भारत सरकारने सेलेबी एव्हिएशनचा परवाना रद्द केला आहे. तुर्कीने भारताविरुद्ध पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. भारताने दिल्ली विमानतळावर कार्गो सेवेसाठी सेलेबी एव्हीएशनला दिलेली मंजूरी रद्द केली आहे.
नऊ प्रमुख विमानतळांवर सेवा
सेलेबी एव्हिएशन भारतातील नऊ प्रमुख विमानतळांना सेवा पुरवते दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि इतर विमानतळांचा यात समावेश आहे. आपण भारताता सर्व नियमांचे पालन करीत असून आमच्या सेवा आणि सुविधांची नियमितपणे CISF, BCAS आणि AAI सारख्या संस्थांकडून तपासणी केली जाते असे सेलेबी एव्हीएशन कंपनीने म्हटले आहे.
