जगातील चार देशात अचानक ब्लॅकआऊट, हवाई सेवा ते मेट्रोपर्यंतचे कामकाज ठप्प

युरोपातील अनेक देशांमध्ये अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स या देशांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. हवाई सेवा, मेट्रो आणि आरोग्यसेवा यांना विस्कळीत झाले आहे.

जगातील चार देशात अचानक ब्लॅकआऊट, हवाई सेवा ते मेट्रोपर्यंतचे कामकाज ठप्प
Spain Portugal Power Outage
| Updated on: Apr 28, 2025 | 7:51 PM

युरोपमधील अनेक देशांमध्ये आज भर दुपारी अंधार पडला आहे. कारण युरोपातील चार प्रमुख देशांमध्ये अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. युरोपात अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने याचा मोठा फटका हवाई सेवा, मेट्रो आणि वैद्यकीय क्षेत्राला बसला आहे. हा वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडीत झाला, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र सध्या युरोपातील सर्व देशात वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

युरोपीय देश स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. हा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे. मेट्रो सेवा थांबली. ज्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रुग्णालयांमध्ये जनरेटरच्या साहाय्याने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना संगणक बंद ठेवण्याचे आणि विजेचा वापर जपून करण्याचे निर्देश दिले आहेत. स्पेनमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

युरोपीय देशातील संपूर्ण वीज व्यवस्था कोलमडली

या वीज पुरवठ्यामुळे फ्रान्समधील काही शहरंही प्रभावित झाली आहेत. स्पेनच्या राष्ट्रीय ग्रीड ऑपरेटर ‘रेड एलेक्ट्रिका’ ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत समन्वय साधून तातडीने पाऊले उचलली जात आहेत. दुसरीकडे, पोर्तुगालच्या ग्रीड ऑपरेटर ‘ई-रेडेस’ ने सांगितले की, युरोपातील वीज ग्रीडमध्ये झालेल्या बिघाडामुळे हे संकट ओढवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, व्होल्टेजमधील असमतोलपणामुळे युरोपीय देशातील संपूर्ण वीज व्यवस्था कोलमडल्याचे बोललं जात आहे.

ब्लॅकआऊटमागे सायबर हल्ला

या ब्लॅकआऊटमागे सायबर हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या दृष्टीनेही बारकाईने तपास सुरू आहे. यापूर्वी युरोपमध्ये लहान-मोठ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. 2003 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये एका झाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे संपूर्ण इटली अंधारात झाला होता. या वेळी तांत्रिक बिघाड आणि सायबर हल्ला या दोन्ही शक्यता विचारात घेऊन तपास केला जात आहे.