SMAT 2025 JHKD vs HAR: जेतेपदावर झारखंडने नाव कोरलं, अंतिम सामन्यात हरियाणाला नमवलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या जेतेपदावर झारखंडने नाव कोरलं. अंतिम फेरीत हरियाणाचा पराभव करत जेतेपद नावावर केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार इशान किशन..

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत झारखंड आणि हरियाणा हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हरियाणाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. झारखंडने प्रथम फलंदाजी करत 3 विकेट गमवून 20 षटकात 262 धावा केल्या आणि विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही हरियाणाला गाठता आलं नाही. हा सामना झारखंडने 69 धावांनी जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं. या विजयात मोलाचा हातभार लावला तो झारखंडचा कर्णधार इशान किशनने.. त्याच्या झंझावाती शतकामुळे झारखंडने 262 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना हरियाणाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. या धावांचा पाठलाग करताना धडाधड विकेट पडत गेल्या आणि जेतेपद वाळूसारखं हातातून निसटत गेलं. झारखंडने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं जेतेपद पहिल्यांदा जिंकलं आहे.
झारखंडला पहिल्याच षटकात फटका बसला होता. विराट सिंह अवघ्या 2 धावांवर तंबूत परतला होता. मात्र त्यानंतर कर्णधार इशान किशन आणि कुशाग्रने डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 82 चेंडूत 177 धावांची भागीदारी केली. इशान किशन 49 चेंडूत 10 षटकार आणि 6 चौकार मारून बाद झाला. त्यानंतर कुशाग्र ही 81 धावा करून तंबूर परतला. त्यानंतर अंकुल रॉय यांनी डाव पुढे नेला. या जोडीने 29 चेंडूत 75 धावांची खेळी केली. हरियाणाकडून तीन गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. अंशुल कंबोज, सुमित कुमार आणइ समंत जाखर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
विजयी धावांचा पाठलाग करताना आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. अंकित कुमार आणि आशिष सिवाच यांना खातंही खोलता आलं नाही. अर्श रांगा देखील 17 धावा करून तंबूत परतला. अशा स्थितीत यशवर्धन दलाल ने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारत 53 धावा केल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर धावगती कमी झाली आणि दुसऱ्या बाजूने धडाधड विकेट पडत गेल्या. प्रत्येक विकेटनंतर हा सामना झारखंडच्या बाजूने झुकत होता आणि झालंही तसंच.. निशांत सिंधु 31, समंत जाखर 38, पार्थ वटस 4, सुमित कुमार 5, अंशुल कंबोज 11 अशा धावा करून तंबूत परतले.
