पोटगीच्या भीतीने अभिनेता म्हणतोय लग्नच नको; मित्राची अवस्था पाहून घेतला धडा
घटस्फोट आणि त्यानंतर द्याव्या लागणाऱ्या पोटगीमुळे अभिनेत्याने लग्नाविषयीच भीती व्यक्त केली आहे. मला लग्न नको पण मूल हवंय, असं त्याने म्हटलंय. हा अभिनेता एकेकाळी अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला डेट करत होता.

‘सबकी लाडली बेबो’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कयामत’, ‘किस देश में है मेरा दिल’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अनुज सचदेवा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. एकेकाळी अनुज अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला डेट कर होता, परंतु या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता ‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत अनुजने लग्नाविषयी भीती व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “मी आजच एक बातमी वाचली की अभिनेत्री सेलिना जेटलीने पोटगी म्हणून पतीकडून 50 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यांच्या नात्याबद्दल मला काही माहीत नाही. परंतु अशा बातम्या वाचल्यानंतर पुरुष घाबरू लागतात. मी कोणावर आरोप करत नाहीये, किंवा स्पष्टीकरण देत नाहीये किंवा माझं मत मांडत नाहीये, परंतु पुरुष आजच्या काळात लग्न करायलाच घाबरत आहेत.”
याविषयी अनुज पुढे म्हणाला, “माझ्या आजूबाजूला असे कितीतरी मित्र आहेत, ज्यांच्यासोबत असं घडलंय. मी नाव घेणार नाही, पण असे अनेक कपल्स आहेत, ज्यांना मी आदर्श जोडपं मानत होतो. लग्नाच्या 6-7 वर्षांनंतर, मुलंबाळं झाल्यानंतर समजतं की पत्नीने त्यांच्यावर केस केली. तो जिथे राहत होता, ते घरसुद्धा घेतलं. आता तो भाड्याच्या घरात राहतोय. त्याला त्याच्या मुलालाही भेटता येत नाही. तो त्याच्या पत्नीला पोटगी देतोय. हा कोणता धंदा आहे? हे खूपच रंजक आहे की तुम्ही आधी खूप पैशेवाल्या व्यक्तीला शोधता. कारण ठराविक वयानंतर तुमचं करिअर संपुष्टात आलेलं असतं. म्हणून मला पत्नीच नकोय. कारण जे मी इतक्या मेहनतीने कमावलंय, ते माझी पत्नीने अचानक दुसरा पार्टनर भेटला म्हणून पोटगीच्या रुपात 50 टक्के घेऊन जावं, अशी माझी अजिबात इच्छा नाही.”
View this post on Instagram
“माझ्या मते या ट्रॉमामधून निघायलाच बरीच वर्षे लागतात. महिलांना तर दोन आठवड्यांत दुसरा पार्टनर भेटतो. मी तर फक्त आताची परिस्थिती सांगतोय. एकतर 12 ते 14 तासांपर्यंत आपण सेटवर काम करतो. इतकी वर्षे मेहनत करून घर, गाडी घेतो, फक्त पोटगीत हे सर्व गमावू लागू नये, हीच माझी इच्छा आहे”, असं मत त्याने मांडलंय.
