शिंदे प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी वाटणार, राऊतांचा खळबळजनक दावा!
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांचे महापालिकेचे बजेट हे दहा हजार कोटी रुपये आहे, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : राज्यत सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. महानगरपालिकेच्या घोषणेनंतर तर आरोप-प्रत्यारोपाचे पेव फुटले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. राज्यात एकाच वेळी मुंबई, पुण्यासह 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता अनेक नेते सोईच्या पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांना तब्बल 10-10 कोटी रुपये वाटणार असून त्यांचे निवडणुकीचे बजेट हे दहा हजार कोटी रुपये आहे, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ‘माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं महानगरपालिकेचं बजेट हे दहा हजार कोटी रुपयांचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते दहा कोटी रुपये देणार आहेत. माझी माहिती पक्की असते. विचार करा. त्यांनी नगरसेवक फोडण्यासाठी पाच-पाच कोटी रुपये दिले. आता ते निवडणूक लढवण्यासाठी दहा-दहा कोटी रुपये देणार आहेत,’ असा मोठा आरोप शिंदे यांनी केला.
नरेश म्हस्के यांनी दिले प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना घाबरलेले आहेत. केवळ आरोप करणे हा एकमेव मार्ग संजय राऊत आणि ठाकरे गटापुढे राहिलेला आहे. चुकीच्या पद्धतीने आरोप करणे, लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, अशा प्रकारे काम चालू आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.दरम्यान, आता राऊतांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
