
Pakistan : पाकिस्तानात नेहमीच काहीतरी घडत असतं. या देशात कधी मोठा बॉम्बस्फोट होतो. तर कधी एखादा दहशतवादी गट समोर येऊन तेथील लष्कराविरोधातच कट रचतो. विशेष म्हणजे इथे लोकनियुक्त सरकार असले तरीही निर्णयप्रक्रियेत लष्कराचा मोठा सहभाग असतो. लष्कराच्या संमतीशिवाय तेथील सरकारला कोणताही मोठा निर्णय घेता येत नाही. दरम्यान, आता पाकिस्तानमध्ये सक्रीय असलेले तसेच पाकिस्तानी हद्दीतून कारवाया करणारे दहशतवादी गट पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. त्यामुळे आता तेथील लष्कर तसेच सरकारचे टेन्शन वाढले आहे. लवकरच पाकिस्तानात सत्तापालट होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील परिस्थिती आता पुन्हा एकदा बिघडत चालली आहे. तेथील दहशतवादी संघटनांना पाकिस्तानी लष्कर तसेच सरकारचे समर्थन असायचे. आता याच दहशतवादी संघटना थेट सरकारविरोधात बोलायला लागल्या आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबा या संघटनेने आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच तेथील सरकारची चिंता वाढली आहे. पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीग (PMML) हा राजकीय पक्ष लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचे प्रतिनिधीत्व करतो. या राजकीय पक्षाचे नेतृत्त्व लष्कर ए तैयबामध्ये मोठ्या पदावर असलेल्या अमीर तल्हा सईद याच्या हातात आहे. PMML या राजकीय पक्षाने 2024 साली पाकिस्तानमधील निवडणुकीत भाग घेतला होता. परंतु या पक्षाला यश मिळाले नव्हते. परंतु एखादा दहशतवादी गट अन्य पक्षाच्या नावाखाली निवडणुकीत उतरणे पाकिस्तानमधील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात लष्कर ए तैयबाचे सीनियर कमांडर मोहम्मद अशफाक राणा याने थेट सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यांनी थेट पाकिस्तानी सरकारला आव्हान दिले. पाकिस्तानातील पंजाबची त्यांनी थेट बलुचिस्तानशी तुलना केली. अशफाक राणाने सरकारला थेट चोर म्हटलं आहे. अशफाक राणा थेट दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. अशी व्यक्ती पाकिस्तानात थेट सरकारविरोधात बोलत असल्याने तेथे चिंत व्यक्त केली जात आहे.
कधीकाळी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना या पाकिस्तानी लष्कराच्या आणि पाकिस्तानी सरकारच्या आश्रयाखाली होत्या, असे म्हटले जायचे. परंतु आता याच दहशतवादी संघटना थेट सरकारविरोधात बोलायला लागल्याने भविष्यात काहीतरी मोठं घडण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.