
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या धुमश्चक्रीत रशियाने आपल्याला दिलेल्या एअर डीफेन्स सिस्टीम S-400 ने कमाल केली होती. पाकिस्तानच्या अनेक क्षेपणास्र आणि ड्रोनचे हल्ले रशियन एअर डीफेन्स सिस्टीम S-400 परतवून लावले होते. या रशियन एअर डिफेन्स सिस्टीमचे उर्वरित स्क्वॉड्रन आता लवकरच भारताला मिळणार आहे. या बाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.
एस–400 एअर डिफेन्स सिस्टमचा चौथा आणि पाचवा स्क्वॉड्रनची डिलिव्हरी रशिया- युक्रेन युद्धामुळे रखडली होती. अलिकडेच चीनमध्ये किंगदाओ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह आणि एंड्री बेलौसेव्ह यांच्यात या संदर्भात द्विपक्षीय बैठकीत चर्चा पार पडली. रशियाने गुरुवारी आश्वासन दिले की ते एस-400 एअर डिफेन्स सिस्टमच्या उर्वरित दोन स्क्वाड्रन साल 2026-27 मध्ये भारताला देणार आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये याच एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानला धुळ चारली होती.
या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहीलय की, भारत -रशिया सहकार्याला अधिक मजबूत करण्या संदर्भात सार्थक चर्चा झाली 2018 मध्ये भारत आणि रशिया दरम्यान 40 हजार कोटी रुपयांच्या डीलवर हस्तांक्षर झाले होते. त्या अंतर्गत भारताला एस-400 चे 5 स्क्वॉर्डन साल 2023 च्या अखेर मिळणार होते. मात्र भारताला आतापर्यंत 3 स्क्वाड्रन मिळालेले आहे.टाईम्सच्या बातमीनुसार आता चौथी स्क्वाड्रन पुढच्या वर्षीपर्यंत तर पाचवी स्क्वाड्रन साल 2027 पर्यंत मिळणार आहे.
एस-400 च्या प्रत्येक एका स्क्वाड्रनमध्ये दोन मिसाईल बॅटरी असतात. त्यात 128 मिसाईल असतात. या मिसाईल 120, 200, 250 आणि 380 किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहेत. यासोबत लांबपल्ल्याचं रडार सिस्टीम आणि कोणत्याही हवामानात चालणारा ट्रान्सपोर्ट व्हेईकल देखील असते.भारतीय वायूसेनेत आधीच तीन एस-400 स्क्वाड्रन असून त्यांना चीन आणि पाकिस्तान विरोधात उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारत सीमेवर तैनात केलेले आहे.