
अमेरिका आणि भारतात व्यापार आणि राजकीय नात्यांमध्ये मोठी दरी आल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर जगभरातून टीका सुरू आहे. भारताने अजूनही ट्रम्प यांच्या धोरणावर कडक टीका केलेली नाही. पण अमेरिकेतूनच ट्रम्प यांना विरोध सुरू झाला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जेफरी सॅक्स यांनी ट्रम्प यांना आरसा दाखवला आहे. भारत अमेरिकेवर अवलंबून असल्याच्या खोट्या भ्रमात ट्रम्प वावरत असल्याचे त्यांनी खडसावले. अशा धोरणांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. तर भारतावर या टॅरिफचा मोठा परिणाम होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी फेटाळली.
हे तर मूर्खपणाचे पाऊल
जेफरी सॅक्स यांनी अत्यंत कडक शब्दात ट्रम्प प्रशासन आणि त्यांच्या सल्लागाराची कान उघडणी केली आहे. असे निर्णय अव्यवहारिक आहेत. हे मूर्खपणाचे पाऊल असल्याचे सॅक्स यांनी ट्रम्प यांना खडसावले. आपल्या परराष्ट्र धोरणातील हे मूर्खपणाचे पाऊल असल्याचा घणाघातच या अर्थतज्ज्ञाने केला.
टॅरिफ लादण्याचा निर्णय आत्मघातकी आहे. जगात अगोदर अस्थिरता असताना आणि अनेक मुद्दांवर उघड मतभेद असताना अमेरिकेचा हा पोरकटपणा सुरू असल्याचे त्यांनी ध्वनीत केले. आशियात अमेरिका एका सच्चा मित्राला मुकणार असल्याचे सॅक्स यांनी सुनावले. त्यांनी असे आत्मघातकी धोरण न राबवण्याचा सल्लाही अमेरिकन प्रशासनाला दिला.
टॅरिफमुळे प्रश्न, समस्या वाढतील
क्रिस्टल बॉल आणि सागर एनजेटी यांच्या ब्रेकिंग पॉईंटस् या शो मध्ये सॅक्स यांनी अमेरिकेच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतावर टॅरिफ ही काही रणनीती होऊ शकत नाही. उलट यामुळे एक सच्चा मित्र आपण गमावून बसू. होणारा संवाद तुटलेच पण अनेक कामंही बिघडतील याकडे त्यांनी ट्रम्प यांचं लक्ष वेधले. हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात मूर्ख पाऊल असल्याचा घणाघात त्यांनी घातला.
जेफरी हे कधीकाळी अमेरिकेच्या प्रशासनातील आर्थिक सल्लागार होते. ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांचा उल्लेख करत, भारतावर 25 टक्के दंड लावण्याच्या निर्णयामुळे रात्रीतूनच हे देश एकत्र आले. या देशातील असा एकोपा यापूर्वी कधीही पाहिला नसल्याचे ते म्हणाले. अमेरिका स्वतःहून आपले शत्रू तर तयार करत नाही ना, मित्र गमावत नाही ना, याविषयी त्यांनी सारासार विचार करण्याचा सल्ला दिला.