त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; PM मोदींना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Highest Civilian Honour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पहिल्यांदाच परदेशी नेत्याला हा पुरस्कार देण्यात आला हे विशेष. दोन्ही देशात सदृढ संबंध असल्याचे हे प्रतिक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. त्यांना ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 25 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी त्यांना रशिया, सौदी अरब, संयु्क्त अरब अमिरात, फ्रान्स या देशासह इतर देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पहिल्यांदाच परदेशी नेत्याला त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाने हा पुरस्कार दिला हे विशेष. दोन्ही देशात सदृढ संबंध असल्याचे हे प्रतिक आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताककडून सन्मान
त्रिनिदाद आणि टोबॅगो या प्रजासत्ताक देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ हा पुरस्कार परदेशी नेत्याला देण्यात आला. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ झाल्याचे हे द्योतक आहे. जागतिक मंचावर भारताला शक्तीशाली देश म्हणून पुढे आणल्याचे कौतुक पंतप्रधान कमला प्रसाद- बिसेसर यांनी मोदींचे केले. या देशात भारतीय वंशीयांचा टक्का अधिक आहे. येथील भारतीयांना मोदींचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या.
या सन्मानाने गहिवरलो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. 140 कोटी भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे ते म्हणाले. हा भारतीय लोकांचा गौरव असल्याचे उद्गार त्यांनी काढले. पहिल्यांदाच एखाद्या परदेशी नेत्याला असा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचे, तिथल्या सरकारचे आणि जनतेचे आभार व्यक्त केले.
येथील जनतेने भारतीय परंपरांचे जतन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 180 वर्षांपूर्वी भारतातील लोक या ठिकाणी आले होते. त्यांनी येथे मैत्रीचा पाया रचला. ते येथे आले तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. भारतीय सभ्यता, संस्कृती, पंरपरा, आणि विविधतेने ते समृद्ध होते. त्यांचे सौहार्द आणि सद्भावनेचे बीज आज या देशात साकारत आहे. आपल्या सामायिक परंपरा, संस्कृती आणि चालीरिती आजही भारतीय समुदायाने जपल्या आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.