Donald Trump : नाहीतर द्यावा लागेल 155 % टॅरिफ ? ट्रम्प यांची पुन्हा धमकी, जगात खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला आहे. व्यापार करार झाला नाही तर 1 नोव्हेंबर पासून 155 टक्के टॅरिफ लावण्यात येईल. बलाढ्य देशाला दिलेल्या या इशाऱ्यामुळे जगात खळबळ माजली आहे.

Donald Trump : नाहीतर द्यावा लागेल 155 %  टॅरिफ ? ट्रम्प यांची पुन्हा धमकी, जगात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Oct 21, 2025 | 9:00 AM

रशियाकडून तेलखरेदी केल्यामुळे भारतावर अमेरिका भडकला असून ट्रम्प यांनी मनमानी निर्णय घेत थेट 50 टक्के टॅरिफ लावला. इतर देशांवरही ट्रम्प यांचे टॅरिफ अस्त्र कोसळत असूम त्यामुळे जगभरातील देश दहशतीखाली आहेत. भारतापाठोपाठ ट्रम्प यांची वक्रदृष्टी चीनवर पडली आणि त्यांनी चीनला सक्त आर्थिक चेतावणी दिली आहे. टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला टॅरिफची धमकी दिली आहे. त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या त्यांच्या आगामी भेटीचा सूरही निश्चित केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिका आणि चीन मोठा करार करतील. मात्र, दोन्ही देशांमध्ये जर कोणताही करार झाला नाही तर चीनवर 155 टक्क्यांपर्यंत टॅरिफ आकारला जाऊ शकतो, असा थेट इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्या भेटीची शक्यताही व्यक्त केली.

व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे स्वागत करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मला वाटते की आम्ही चीनसोबत एक उत्तम करार करणार आहोत. तो एक उत्तम व्यापार करार असेल. तो (करार) दोन्ही देशांसाठी आणि संपूर्ण जगासाठी शानदार ठरेल.” ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत एका महत्त्वाच्या खनिज करारावर स्वाक्षरी केली तेव्हाच त्यांनी हे विधान केलं.

काय म्हणाले ट्रम्प ?

पुढे ट्रम्प म्हणाले, ‘ मला असं वाटतं की चीनला आमचा खूप आदर आहे. टॅरिफच्या रुपाने ते आम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे देत आहे. सध्या ते 55% (टॅरिफ) देत आहेत, ही मोठी रक्कम आहे. अनेक देशांनी अमेरिकेचा फायदा घेतला आहे पण आता ते गैरफयाद घेऊ शकत नाहीयेत. चीन 55% टॅरिफ भरत आहे आणि जर आमच्यात (दोन्ही देशांत) करार झाला नाही तर 1 नोव्हेंबर पासून त्यांना 155% टॅरिफ भरावा लागू शकतो. मी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहे. आमचे खूप चांगले संबंध आहेत, आम्ही काही आठवड्यांत दक्षिण कोरियामध्ये भेटत आहोत. मला वाटते की आम्ही असं काहीतरी करू, जे दोन्ही देशांसाठी चांगले असेल ‘ असं ट्रम्प यांनी नमूद केलं.

ट्रम्प यांचं वक्तव्य महत्वाचं का ?

स्मार्टफोन, लढाऊ विमाने, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या निर्यातीवर चीनने नियंत्रण लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले आहे. चीनसोबतच्या वाटाघाटींमध्ये ट्रम्प यांनी टॅरिफला एक प्रमुख शस्त्र म्हणून घोषित केले असून आणि दुर्मिळ खनिजांच्या उत्पादनांवर बीजिंगच्या विस्तारित निर्यात नियंत्रणांना प्रतिसाद म्हणून 100% टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती. तर आता त्यांनी 155 टक्के टॅरिफचाही इशारा दिला आहे.