
भारत-अमेरिकेत जशी ट्रेड डील झालीय, तशीच काल बांग्लादेश-अमेरिकेतही ट्रेड झालीय. पण बांग्लादेशसोबतच्या अमेरिकेच्या ट्रेड डीलमुळे भारताला एका महत्वाच्या उद्योगात मोठा फटका बसू शकतो. भारतातून अमेरिकेला मोठ्या प्रमात मस्त्य उत्पादनं, ज्वेलरी, हिरे, मसाले तसेच कपड्याची निर्यात होते. यात बांग्लादेशसोबतच्या करारामुळे भारताच्या अमेरिकेतील कपडा निर्यातीच्या महत्वकांक्षेला फटका बसू शकतो. नव्या करारानुसार अमेरिकेने बांग्लादेश वस्तुंवरील टॅरिफ 19 टक्के केलाय. भारताच्या टॅरिफपेक्षा हा 1 टक्का जास्त आहे. भारतीय वस्तुंवर 18 टक्के टॅरिफ आहे. अमेरिका बांग्लादेश करारात एक असं कलम आहे, त्यामुळे बांग्लादेशच्या कपडा निर्यातीला मोठा बूस्ट मिळू शकतो.
विश्लेषकांनुसार, बांग्लादेश-अमेरिका ट्रेड डीलमधून बांग्लादेशच्या कपडा निर्यातीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. बांग्लादेशला निर्यातीतून जो महसूल मिळतो, त्यात 80 टक्क्यापेक्षा जास्त वाटा कपडा उद्योगाचा आहे. बांग्लादेशात 40 लाख लोक कपडा उद्योगात काम करतात. यात महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये कपडा उद्योगाचा वाटा 10 टक्के आहे.
करारात अशी काय तरतूद?
या करारात एक अशी तरतूद आहे, त्यानुसार बांग्लादेशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या काही ठराविक कपड्यांवर शून्य टॅरिफ लागणार आहे. भारतीय कपडा उद्योगासाठी ही तरतूद चिंता वाढवणारी आहे. “अमेरिकेतून आयात केलेलं कॉटन आणि सिंथॅटिक फायबर यापासून बनवलेल्या रेडीमेड कपड्यांवर अमेरिकेत शून्य टॅरिफ लागेल अशी या करारात तरतूद आहे” असं बांग्लादेशच्या व्यापार सचिवाने सांगितलं. अमेरिकेचं 118 अब्ज डॉलरचं कपडा आणि वस्त्र आयातीचं मार्केट आहे. भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कपडा निर्यात होते. जवळपास 10.5 अब्ज डॉलर्स कपड्याची निर्यात होते. बांग्लादेशच्या कपडा निर्यातीसाठी असलेल्या या विशेष तरतुदीचा भारताला मोठा फटका बसू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय होता?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी रेसिपोकल टॅरिफनुसार भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सामानावर 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे भारतीय सामानावर एकूण 50 टक्के टॅरिफ होता. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो,त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या पैशातून रशियाला युद्ध सुरु ठेवण्यासाठी ताकद मिळते, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा होता. म्हणून भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता.